काळ आला होता पण... नंदुरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
By Admin | Published: August 11, 2016 08:38 AM2016-08-11T08:38:20+5:302016-08-11T11:20:22+5:30
नंदुरबारमधील नवापूरमधील रंगावली नदीला पूर आल्याने एक एसटी बस वाहून चालली असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. ११ - 'काळ आला होता पण वेळ आली होती' अशी आपल्याकडे म्हण आहे, मात्र नंदुरबारमधील नवापूर येथील नागरिकांनी या म्हणीचा अक्षरश: प्रत्यय घेतला. महाडमधील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने दोन एसटी व काही गाड्या वाहू गेल्या व अनेकांनी प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेला आठवडाही उलटत नाही तोच नंदुरबारमधील नवापूरमध्येही अशीच दुर्घटना घडली, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे १७ प्रवाशांचे प्राण वाचले.
जालना सुरत एस टी बस सूरत कड़े जात असताना नवापुर शहरातून वाहणाऱ्या रंगावली नदीच्या पुरपात्रात पहाटे पाचच्या सुमारास अडकली. बसमध्ये १७ प्रवासी होते. एमएच 20 बी एल 2610 ही एसटी बस रंगावली नदीत वाहून जात होती हे दिसताच स्थानिकांनी नागरिकांनी आरडाओरड करून मदत मागवली. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवत जेसीबीच्या साहाय्याने बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं. घटनास्थळी पोलीस अधीक्षक रमेश ड़हाळे व एस टी चे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली. सर्व प्रवाशांना अन्य परळी सुरत या बसमधून सुरतकडे मार्गस्थ करण्यात आले.
गुजरातच्या सीमेलगत असलेल्या अहावा डांग जंगल परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील रंगावली नदीला पूर आला आहे.