शिवसेनेला सुटी देण्याची हीच वेळ - मुख्यमंत्री
By admin | Published: February 11, 2017 05:19 AM2017-02-11T05:19:30+5:302017-02-11T05:19:30+5:30
माझा विरोध शिवसेनेला नाही; मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्यपद्धतीला आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिले की, पराकोटीची बेपर्वाई येते.
यदु जोशी, मुंबई
माझा विरोध शिवसेनेला नाही; मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्यपद्धतीला आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिले की, पराकोटीची बेपर्वाई येते. आपण कसेही वागलो तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी वृत्ती येते. अशा लोकांना सुटी देण्याची वेळ कधी ना कधी येते. ती नेमकी वेळ आता आली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेबाहेर काढण्याचे संकेत दिले.
मराठी माणसाच्या नावावर बरीच वर्षे भावनिक राजकारण खेळले गेले. आता ते मराठी माणसाला नीट कळले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही तुटूच शकत नाही, त्यामुळे भावनिक राजकारणाला यापढे थारा मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
...तर मंत्रिमंडळ बैठक
खुली करण्याची तयारी
पारदर्शकतेसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकार यांना बसू देण्याची घटनेमध्ये तरतूद असेल तर आपली पूर्ण तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. हार्दिक पटेलला बोलावून अंगावर शाल टाकल्याने गुजराती मते फुटणार नाहीत; पण त्यांची मराठी मते विचलित झाली आहेत, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.
प्रश्न : नेमक्या कोणत्या मुद्द्यावर मुंबईत युती तुटली?
मुख्यमंत्री : पारदर्शकतेचा मुद्दा संयुक्त जाहीरनाम्यात टाकावा, अशी आमची भूमिका होती. ते आपल्याच महापालिकेच्या विरुद्ध जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. मला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीबाबत निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते. मी युतीसाठी पारदर्शकतेचा आग्रह धरला. त्यातूनच युती तुटली.
प्रश्न : शंकराचार्य बसायचे त्या भाजपाच्या मंचावर आता गुंडाचार्य बसू लागलेत, या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचे काय?
मुख्यमंत्री : आम्ही फार गुंड लोकांना घेतलेले नाही. पक्षाचा विस्तार झाला, पक्ष मोठा झाला की अनेक लोक येत असतात, पण आमच्यावर जे आरोप करतात त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे?
प्रश्न : पंतप्रधान मोदींसोबत पप्पू कलानीचा फोटो असलेले पोस्टर व्हायरल झाले, त्याचे काय?
मुख्यमंत्री : उल्हासनगरमध्ये ओमी कलानी आमच्यासोबत आहेत. तुम्ही जे पोस्टर म्हणता ना ते आमच्याविरुद्ध सुडो वॉर छेडलेल्यांनी बनविलेले आहेत. त्यासाठी त्यांनी खास टीम तयार केल्या आहेत. स्वत:च पोस्टर करून ते व्हायरल करीत आहेत.
प्रश्न : उद्धव ठाकरे यांनी पूर्ण प्रचारात आपल्याला टार्गेट केले आहे?
मुख्यमंत्री : त्यांच्यावर टीका करीत सुटणे हा माझा अजेंडा नाही. माझा अजेंडा पारदर्शकतेचा आहे. त्या अनुषंगाने घोटाळ्यावर मी बोलणारच. दुर्दैवाने ठाकरे यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही.
प्रश्न : आपण मुंबईची तुलना पाटण्याशी केली हे आपल्याला योग्य वाटते?
मुख्यमंत्री : तक्रार निवारण हा पारदर्शकतेचा पाया आहे. त्याबाबत मुंबई महापालिका आणि पाटण्याला या अहवालात समान गुण दिलेले आहेत. तिरुअनंतपुरम, हैदराबादसह अनेक शहरे आपल्या पुढे आहेत. मी तुलना केलेली नाही. पाटण्याला मुंबईच्या बरोबरीने आणले याबद्दल तर बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
प्रश्न : जिल्हा परिषदांत भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे. आपण कोणते मुद्दे घेऊन जात आहात?
मुख्यमंत्री : लोकांमध्ये सरकारबद्दल विश्वासाची भावना आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेले काम, जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महात्मा फुले जीवनदायी योजनेची वाढविलेली व्याप्ती, मागेल त्याला तळे, कृषी वीज पंपांचे दिलेले सर्वाधिक कनेक्शन, हजारो शाळा डिजिटल केल्या, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत १२०० आजार समाविष्ट करून लाभार्थ्यांची संख्या दीडपट करणे, या आमच्या उपलब्धी आहेत. लोकांना या सरकारबद्दल असलेला भरवसा मला प्रत्येक सभांमधून जाणवतो.