'अंधेरीच्या राजा'ला यंदा कुणकेश्वर मंदिराचा देखावा
By Admin | Published: September 7, 2016 07:52 PM2016-09-07T19:52:25+5:302016-09-07T19:52:25+5:30
नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम उपनगरातील अंधेरी (प.) येथील अंधेरीच्या राजाने यंदा ५१व्या वर्षात पदार्पण केले
मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम उपनगरातील अंधेरी (प.) येथील अंधेरीच्या राजाने यंदा ५१व्या वर्षात पदार्पण केले असून, परळ रेल्वे वर्कशॉपमधील प्रसिद्ध मूर्तिकार राजन खातू यांनी ८.५ फुटांची अंधेरीच्या राजाची मूर्ती तयार केली आहे. यंदा अंधेरीचा राजा प्रसिद्ध कोकणातील कुणकेश्वर मंदिरात विसावला आहे.
१९७४ पासून अंधेरीच्या राजाचे संकष्टीला विसर्जन होते.यंदा देखिल प्रसिद्ध कला दिग्दर्शक धर्मेश शहा यांच्या शंकल्पनेतून सुमारे २५० कलाकारांनी गेली दोन महिने अहोरात्र काम करून आपल्या कलाकुसरी आणि कोरीव कामांमधून कोकणातील देवगडपासून १६ किमी अंतरावर असलेल्या कुणकेश्वर मंदिराचा हुबेहूब देखावा साकारला आहे अशी माहिती समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे यांनी दिली.
यंदाही देखिल आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीने ड्रेस कोड लागू केला आहे.तोकडे कपडे,मिनी स्कर्ट,आणि सिवलेस कपडे घालून येणाऱ्या गणेश भक्तांना अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही.आपल्या संस्कृतीचे पालन आणि अंधेरीच्या राजाचे पावित्र्य लक्षात घेता समितीचे श्री.यशोधर(शैलेश)फणसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ड्रेस कोड २०१२ साली येथे लागू केला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष केशव तोंडवलकर आणि खजिनदार सुबोध चिटणीस यांनी दिली.ड्रेस कोड लागू करणारे हे मुंबईतील पहिला सार्वजनिक गणपती असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्याच्या इंटरनेटच्या युगात येथील मंडप परिसरात वाय फाय कनेक्शनची सुविधा देखील गणेश भक्तांना उपलबद्ध आहे.तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,खासदार गजानन कीर्तिकर,महापौर स्नेहल आंबेकर तसेच सर्वपक्षीय राजकीय नेते,प्रसिद्ध अभिनेता सलमान खान,नाना पाटेकर,प्रियांका चोपडा,प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीज-गायक अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत अशी माहिती कार्यकारी अध्यक्ष महेंद्र देढीया आणि सहखजिनदार सचिन नायक यांनी दिली.यंदा येथे कोणतीही घात पात होऊ नये म्हणून २५ सीसी टिव्ही कॅमेरा येथे बसवण्यात आले आहेत.तर समितीचे सुमारे २५० कार्यकर्ते अहोरात्र येथे जगता पहारा ठवणार असल्याची माहिती समितीचे सचिव विजय सावंत आणि राजेश फणसे यांनी दिली.
१९७३ साली येथील आझाद नगर मध्ये राहात असलेले आणि गोल्डन टोबँको,एक्सल,टाटा स्टील आणि अन्य कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कारखाने बंद पडले होते.आमचे कारखाने लवकर सुरु होऊ देत म्हणून आम्ही संकष्टीला विसर्जन करू असा नवस अंधेरीच्या राजाला केला.आणि कारखाने परत सुरु झाले.त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला
विसर्जन होते.या दिवशी सायंकाळी अंधेरीच्या राजाची संपूर्ण रात्रभर भव्य मिरवणूक निघते.आणि दुसऱ्या दिवशी दुपारी वेसावे येथील खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे विसर्जन होते अशी माहिती सुबोध चिटणीस आणि प्रकाश रासकर यांनी दिली.