माऊलींच्या आजोळघरच्या मुक्कामाला यंदाही अडथळा
By admin | Published: June 13, 2016 09:13 PM2016-06-13T21:13:42+5:302016-06-13T21:13:42+5:30
गेल्या वर्षी माऊलींच्या आजोळघरी मुक्कामासाठी अडथळा ठरणारा जिना देवस्थानने लेखी आश्वासनानंतर अद्यापही काढला नसल्याने
श्रीकांत बोरावके
आळंदी : गेल्या वर्षी माऊलींच्या आजोळघरी मुक्कामासाठी अडथळा ठरणारा जिना देवस्थानने लेखी आश्वासनानंतर अद्यापही काढला नसल्याने या वर्षीही माऊलींचे प्रस्थान विलंबानेच होणार का? असा प्रश्न आता वारकरी विचारू लागले आहेत.
ह्यतोह्ण जिना हटवावा, या मागणीवर वारकरी संघटना ठाम असून, आता जिना हटविण्याची गरज राहिली नसल्याचे देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आजोळघराच्या जागी बांधण्यात आलेल्या नवीन दर्शनबारीच्या जिन्यामुळे पालखी मुक्कामास अडचण होत असल्याने तो हटवावा, या मागणीसाठी वारकरी संघटना, पालखी सोहळा मालक यांनी पालखी गतवर्षी दोन ते तीन तास उशिरा हलवली होती. या प्रकारामुळे देवस्थान व पालखी सोहळा मालक वारकरी संघटना यांमध्ये समन्वय नसल्याचे चव्हाट्यावर आले आहे. गतवर्षी जिना हलविण्याबाबत देवस्थानने लेखी आश्वासन दिल्यानंतरच पालखी हलविण्यात आली होती. मात्र, अद्यापही तो जिना हलविण्यात आलेला नाही.
माऊलींच्या वैभवी पालखी प्रस्थान सोहळ्यास विलंब होणार नाही? समाज आरतीला प्रथा परंपरेने असलेल्या दिंड्या, वाढता समाज, वाढते सोहळ्याचे वैभव याचा विचार करून पहिल्या मुक्कामाचे ठिकाणी मध्येच जिना असल्याने जागा उपलब्ध व्हावी, याबाबत दक्षता घेऊन आळंदी देवस्थानाने तत्काळ खुलासा करावा, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
मुक्कामाच्या जागेत वाढ
लोकमतने सदर जागेची पाहणी केली असता, देवस्थानकडून मुक्कामाच्या जागेत काहीअंशी वाढ करण्यात आली आहे. परंतु, अडसर ठरणारा जिना काढण्यात आलेला नाही. तत्कालीन गांधी वाड्यातील (आताची दर्शनबारी इमारत) विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचं छोटसं मंदिर अंदाजे दहा फूट दर्शन बारी मंडपात आत सरकविण्यात आले आहे. जिन्याला आडवी भिंत घालण्यात आली आहे. जिन्यापुढेच जागा वाढविण्यात आली आहे.
.....असे आहे जिना प्रकरण
भाविकांच्या सोईसाठी प्रशस्त दर्शनबारीचे काम गांधी वाड्याच्या जागेत करण्यात आले असून, मुक्कामाच्या हॉलमध्ये मध्यभागी जिना उभारण्यात आला. यामुळे मुक्कामाला याचा अडथळा ठरत असल्याने गेल्या वर्षी माऊलींचा मुक्काम कुठे करायचा? असा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर चर्चा होऊन देवस्थानने लेखी आश्वासन देऊन तो हटविण्यात येईल, असे सांगितले होते. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ह्यश्रींह्णच्या वैभवी प्रस्थानाचा मार्ग मोकळा झाला होते. मात्र, उशिरा प्रस्थान होऊन नव्या इमारतीत पहिला मुक्काम झाला.
श्रींचे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या आजोळघरीची जागा समाजआरतीचा समाज पाहता कमी पडत आहे. या सोयीसाठीचे कारण पुढे करून मागील वर्षी प्रस्थानला विलंब झाला. मात्र, आळंदी देवस्थानने दिलेल्या लेखी आश्वासनाचा जाब आणि खुलासा व्हावा, ही माफक अपेक्षा आहे.
: हभप बाळासाहेब आरफळकर, संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे मालक
जिना काढण्याची गरज नाही
गतवर्षी वारकरी, फडकरी, दिंडेकरी संघटनेने केलेली पालखी मुक्कामास जागा कमी पडत असल्याच्या मागणीची योग्य दखल घेऊन दर्शनबारीच्या बांधकामात काही बदल करण्यात आले. मुक्कामाच्या जागेवर समतोल भराव व काही बदल करून प्रशस्त जागा करण्यात आली आहे. जिना ज्या कारणासाठी काढला जावा, असा प्रश्न उद्भवला होता. ते कारणच बांधकामात बदल केल्याने राहिले नसून आता जिना हटविण्याची गरज राहिली नाही. संबंधित बदल हे सर्व मागणी करणाऱ्या संबंधित घटकांशी चर्चा करूनच करण्यात आले होते.
:- डॉ. अजित कुलकर्णी,
प्रमुख विश्वस्त, संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी