इच्छुकांवर ‘सेल्फी विथ टॉयलेट’ची वेळ ; डोकेदुखी
By admin | Published: February 2, 2017 02:26 PM2017-02-02T14:26:12+5:302017-02-02T14:26:12+5:30
उमेदवारी अर्जासोबत छायाचित्र प्रत बंधनकारक
नाशिक : निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असेल तर कधी कुठल्या प्रसंगाचा सामना करावा लागेल, याची शाश्वती नसते. तसेच कधी कोणता दुर्दैवी प्रसंग ओढावेल, हेदेखील सांगता येत नाही. सध्या इच्छुकांना अशाच एका प्रसंगाचा सामना करावा लागत आहे, तो म्हणचे चक्क ‘सेल्फी विथ टॉयलेट’चा.
निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्जामध्ये लेखी अर्ज जमा करताना त्यासोबत ‘सेल्फी विथ टॉयलेट’चे छायाचित्र जोडणे बंधनकारक केले आहे. हे सेल्फी छायाचित्र जोडल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रि या यशस्वीरीत्या पूर्ण होत नाही व निवडणूक आयोगाकडून अर्ज ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे इच्छुकांना शौचालय दिसेल असा सेल्फी काढणे अत्यावश्यक आहे. हा सेल्फी काढताना इच्छुकांना कसरत करावी लागत आहे. कारण शौचालय लहान असल्यामुळे इच्छुकांच्या उंचीनुसार जरी शौचालयाच्या दाराजवळ उभे राहून सेल्फी क्लिक केला तरी त्या छायाचित्रात शौचालय असल्याचे दिसून येत नाही केवळ भिंती दिसतात. अशावेळी उमेदवारांना मात्र डोक्याला हात लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कमी उंची असलेल्या उमेदवारांचा हा ‘शौचालय सेल्फी’चा प्रयोग यशस्वी होत असला तरी जास्त उंचीच्या उमेदवारांसाठी मात्र हा प्रयोग डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे काही उमेदवारांना कुटुंबातील अन्य सदस्यांची मदत घेत सेल्फी न काढता छायाचित्र काढून घ्यावे लागत आहे. एकूणच सदर बाब सध्या निवडणुकीच्या वातावरणात चर्चेचा मुद्दा बनली असून, महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये तसेच भ्रमणध्वनीवरून काढलेल्या ‘सेल्फी विथ टॉयलेट’चे छायाचित्र काढताना छायाचित्र डेव्हलप लॅबमध्ये हशा पिकत आहे. या अटीमागे निवडणूक आयोगाचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या व भावी लोकप्रतिनिधी होणाऱ्या उमेदवारांच्या घरी शौचालय आहे की नाही हे तपासणे. यासाठी ‘शौचालय सेल्फी’ची अट टाकण्यात आली आहे.
---
तांत्रिक बाबींमुळे निराशा
आॅनलाइन नामनिर्देशन अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांची दमछाक होत असून, तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना पदरी निराशा पडत आहे. एकीकडे स्लो सर्व्हर तर दुसरीकडे पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी होणारा विलंब आणि उमेदवारीच्या नामनिर्देशन अर्जामध्ये भरावयाच्या माहितीबाबत अत्यंत क्लिष्ट बाबी यामुळे उमेदवारांच्या नाकीनव आले आहे. पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर मुदतीमध्ये नामनिर्देशन अर्ज आॅनलाइन भरणे म्हणचे एक मोठे आव्हान राहणार आहे.