यंदाही एसटीचा ४२१ कोटींचा गल्ला!
By admin | Published: April 5, 2016 12:55 AM2016-04-05T00:55:31+5:302016-04-05T00:55:31+5:30
संपूर्ण वर्षभर प्रवाशांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबविणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने यंदाही प्रवासी उत्पन्नात ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
पुणे : संपूर्ण वर्षभर प्रवाशांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबविणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने यंदाही प्रवासी उत्पन्नात ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत पुणे विभागास तब्बल ४२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २०१४-१५ मध्ये हे उत्पन्न ४१८ कोटी रुपयांचे होते.
या वर्षी या उत्पन्नात सुमारे ३ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती पुणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली. पुणे विभागाच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली असून, हा आकडा या वर्षी ११ कोटींच्या घरात पोहोचला आहे. पुणे विभागात एसटीचे सुमारे १३ डेपो असून, जवळपास २५ मो्ठी बसस्थानके आहेत. या माध्यमातून दर वर्षी जवळपास ११ कोटी प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यात प्रामुख्याने पुणे विभागाकडून दर वर्षी उन्हाळी तसेच दिवाळी सुटया, सणांसाठी जादा गाड्या सोडल्या जातात. याशिवाय प्रवाशांची संख्या वाढत असल्याने दहाहून अधिक मार्गावर विनावाहक विनाथांबा बससेवाही सुरू करण्यात आली आहे. या सेवांमुळे प्रवासी संख्या वाढण्यास मदत झाली असून, पुणे विभागाचे तिकिटांपासून मिळणारे उत्पन्नही वाढले आहे. त्यामुळे राज्यात पुणे विभाग गेल्या ११ महिन्यांपासून नफ्यात आहे. या वर्षीही पुणे विभागाची उत्पन्नवाढ कायम राहिलेली आहे. (प्रतिनिधी)