हीच वेळ विदर्भाच्या लढाईची

By admin | Published: March 27, 2016 03:24 AM2016-03-27T03:24:48+5:302016-03-27T03:24:48+5:30

पश्चिम महाराष्ट्रासाठी १०६ लोक हुतात्मे झाल्याचे सांगतात. तुमच्या नाकर्तेपणामुळे विदर्भ-मराठवाड्यातील २९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचे काय, असा सवाल ज्येष्ठ

This time Vidharbha's battle was fought | हीच वेळ विदर्भाच्या लढाईची

हीच वेळ विदर्भाच्या लढाईची

Next

नागपूर : पश्चिम महाराष्ट्रासाठी १०६ लोक हुतात्मे झाल्याचे सांगतात. तुमच्या नाकर्तेपणामुळे विदर्भ-मराठवाड्यातील २९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचे काय, असा सवाल ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे शनिवारी केला. आम्हाला हिंसक आंदोलन आवडत नाही. कारण त्यात आमचीच मुले मरतात. तेलंगणच्या आंदोलनात १२०० मुलांचा जीव गेला. परंतु विदर्भाच्या निर्णायक लढाईची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
अ‍ॅड. अणे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर महाधिवक्तापदाचा राजीनामा दिला. पदमुक्त झाल्यावर ते शनिवारी नागपुरात आले. या वेळी विदर्भवादी संघटनांतर्फे संविधान चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आपल्या स्वागताला उत्तर देताना ते बोलत होते.
ही अखेरची लढाई नाही, तर शेवट करायला लावणारी लढाई आहे. ती लोकशाही मार्गाने व्हावी, अशी आमची इच्छा आहे. वेळ पडली तर कायदा मोडून सत्याग्रहसुद्धा करू. आम्हाला तेलंगणप्रमाणे हिंसक आंदोलन करायचे नाही. परंतु शासनाने विदर्भाच्या या आंदोलनाला गांभीर्याने न घेतल्यास तसे आंदोलन होणे दूर नाही, असा इशारासुद्धा अ‍ॅड. अणे यांनी दिला. गेल्या ६० वर्षांत पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाचा पैसा चोरून नेला. त्यातूनच पश्चिम महाराष्ट्राचा विकास साधला गेला आणि विदर्भाला मागासलेले ठेवले. १९८६पासून २०१५ पर्यंत दांडेकर समितीचा अभ्यास केल्यास पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाचा पैसा कसा चोरून नेला हे आकडेवारीनुसार दिसून येते.
विदर्भ वेगळा झाला तर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणार नाही, असे बोलले जाते. परंतु विदर्भ वेगळा झाल्यास पश्चिम महाराष्ट्राची वाट लागेल, असे अ‍ॅड. अणे यांनी सुनावले.
वैदर्भीय जनतेला हवाय विदर्भ
विदर्भाची मागणी ही केवळ नेत्यांची मागणी आहे, ती लोकांची नाही, असे सांगितले जाते. या मागणीला जनतेचा किती पाठिंबा आहे, याचा निकाल जनमंचने घेतलेल्या जनमत चाचणीद्वारे कधीचाच दिला आहे. ९४ ते ९८ टक्केपर्यंत नागरिकांनी विदर्भाच्या बाजूने कौल दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
विदर्भात जात-धर्म व भाषेचे राजकारण नाही
स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास हिंदी भाषिकांचे राज्य येईल. हिंदी भाषिकांकडून मराठी बांधवांवर अन्याय होईल, असे महाराष्ट्रातील लोक सांगतात. हिंदी-मराठी हा वाद विदर्भात नाही. विदर्भाने कधीच जाती धर्माचे व भाषेचे राजकारण केले नाही. पानठेल्यावर बोलली जाणारी ही आमची मातृभाषा आहे. महात्मा गांधी हे गुजरातमधील आश्रम सोडून विदर्भात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरची निवड केली, ही येथील महानता आहे, हे समजून घेण्याची गरज आहे, असेअ‍ॅड. अणे म्हणाले.

पत्रपरिषदेत ‘स्वाभिमानी’ शिरले
अ‍ॅड. श्रीहरी अणे हे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत असताना विदर्भविरोधक असलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे धंतोली येथील टिळक पत्रकार भवनात त्यांचा पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्तेही पत्रकार म्हणून घुसले.
सायंकाळी ५.३०च्या सुमारास स्वाभिमानीच्या एका कार्यकर्त्याने अणे यांना महाराष्ट्राचे तुकडे करून काय मिळणार, असा प्रश्न विचारला. यावर पत्रकारांनी त्यांना रोखले.
पत्रकार नसल्याने तुम्ही प्रश्न विचारू शकत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते विदर्भविरोधी घोषणा देऊ लागले. लगेच विदर्भ समर्थकही स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देऊ लागले. काही वेळ दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती.

आरएसएसमध्ये कधीच नव्हतो
राज ठाकरे यांनी केलेले माझा बोलविता धनी कोण हे वक्तव्य मात्र विचार करायला लावणारे आहे. माझे आजोबा हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. विदर्भाच्या मुद्द्यावर काँग्रेसला हरवून ते निवडून आले होते. मी काँग्रेसचा सदस्य नाही. भाजपातही नाही आणि आरएसएसमध्ये तर कधीच नव्हतो, असे अ‍ॅड. अणे यांनी जाहीर केले.

Web Title: This time Vidharbha's battle was fought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.