मतदानाला लागणार वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 01:09 AM2016-10-31T01:09:30+5:302016-10-31T01:09:30+5:30
राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन) वाढणार आहेत.
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला यंदा प्रथमच ४ उमेदवारांना मते द्यावयाची असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन) वाढणार आहेत. त्यामुळे मतदानाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. या मतदान प्रक्रियेची माहिती सर्व मतदारांना असावी, यासाठी निवडणूक यंत्रणेला दक्षता घ्यावी लागणार आहे.
पुणे महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक मतदाराला २ उमेदवारांना मते द्यावयाची होती. आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदारास ४ उमेदवारांना मते द्यावयाची आहेत. मतदानयंत्रांची रचनाच अशी असेल, की प्रत्येक मतदाराला ४ मते द्यावीच लागतील. प्रत्येक मत नोंदणीनंतर मत पूर्ण झाल्याचा विशिष्ट संकेतध्वनी यंत्रातून येतो. एक मत दिल्याशिवाय दुसऱ्या मतासाठी यंत्राची सज्जता होऊ शकत नाही. प्रत्येक मत दिल्यानंतरच कंट्रोल बॉक्स ओपन होऊन दुसरे मत किंवा कोणालाही मत नाही (नोटा) नोंदणी होईल. त्यानंतरच एका मतदाराच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.
त्यामुळे एका मतदाराला चारही मते नोंदवावीच लागतील. मतदाराला अपेक्षित असलेली २ किंवा ३ मते देऊन तो यंत्रापासून दूर जाऊ शकणार नाही. एखाद्या नापसंत उमेदवाराऐवजी त्याला कोणालाही मत नाही (नोटा)हा पर्याय अवलंबिता येणे शक्य आहे.
मतदार याद्या अद्ययावत असल्यास, मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक यंत्रणेने प्रबोधन केलेले असल्यास एका मतदाराला मत नोंदविण्यासाठी ४० ते ५० सेकंद पुरेसे असून मतदान झाल्यानंतर
बोटाला खुणेची शाई लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेस सुमारे १ मिनिटांचा अवधी लागेल.
आगामी निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांशिवाय अन्य काही पक्ष व अपक्ष यांची भाऊगर्दी बहुसंख्य प्रभागांमध्ये असणार आहे. राजकीय पक्षांचे २० व अन्य असे मिळून
२४ किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असू शकतील.
(प्रतिनिधी)
>‘नोटा’चाही अधिकार : मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यक
एका इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिनमध्ये एकावेळी १२ उमेदवारांची मते नोंदविण्याची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक मते एका यंत्रावर नोंदवायची झाल्यास त्या प्रकारचे तंत्र राज्य शासनाच्या निवडणूक शाखेला अवलंबावे लागणार आहे. साधारणत: एका मतदान केंद्रावर २ किंवा ३ यंत्रे असण्याची दाट शक्यता आहे.एखाद्या मतदाराने ४ ऐवजी कमी मते दिली तर त्याला सर्व मते देण्याबाबत किंवा नोटाचा वापर करण्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या लागण्याची शक्यता असून त्यामुळे मतदानाचा वेळ वाढू शकेल. अन्य निवडणुकांच्या तुलनेत नगर परिषद किंवा महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या अधिक असते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीने क्लिष्टता वाढणार असून मतमोजणीसाठी लागणारा वेळही वाढणार आहे. निवडणूक यंत्रणेत काम करण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या एका जाणकाराने सांगितले, की ४ उमेदवारांच्या प्रभागामुळे मतदान यंत्रणेपुढचे काम वाढू शकेल. या निवडणुकीसाठी मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक शाखेने आतापासूनच मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.