संकटकाळात ‘लोकमत’ने दिला आधार, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांपर्यंत मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:06 AM2021-05-13T06:06:06+5:302021-05-13T06:10:28+5:30
कोरोनाच्या रूपाने जग अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. या महामारीने प्रत्येकाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पार बदलून टाकले आहे.
मुंबई : कोरोना संकटाने कित्येकांची जिवाभावाची माणसे कायमची हिरावून घेतली आहेत. ‘लोकमत’ परिवारातीलही काही सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या ‘लोकमत’ परिवारातील सदस्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांपर्यंतचे विशेष अर्थसाहाय्य करण्याची घोषणा ‘लोकमत’ समूहाचे संपादकीय संचालक व कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी केली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी ‘लोकमत’ने मानवतेचा हा कृतिशील आदर्श ठेवला आहे.
कोरोनाच्या रूपाने जग अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. या महामारीने प्रत्येकाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पार बदलून टाकले आहे. अशा कठीण परिस्थितीत पाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्याचे बळ देण्याची गरज ओळखून ‘लोकमत’ने हे पाऊल उचलले आहे.
कोरोनामुळे ‘लोकमत’ने आपल्या परिवारातील जिवाभावाची माणसे गमावली आहेत. त्यांच्या जाण्याने संस्थेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. अशा कसोटीच्या क्षणी शोक आवरता घेऊन कोलमडून पडलेले संसार सावरण्यासाठी आणि त्यांची आयुष्ये पुन्हा उभी करण्यासाठी त्यांना मायेचा, हक्काचा आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे.
कोविडच्या या संकटकाळात ‘लोकमत’ परिवारातील प्रत्येक सदस्याची काळजी आणि त्यांच्याबद्दलची बांधिलकी जाणिवेतून ‘लोकमत केअर्स’ ही योजना आखण्यात आली असून, त्यामार्फत ही मदत केली जाणार आहे. या योजनेतून कोरोनामुळे जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना संरक्षित केले जाणार आहे.
कोरोना महामारीमध्ये संपूर्ण देश संकटातून जात आहे. अनेक कुटुंबांची हानी होत आहे. मागील काही दिवसांत ‘लोकमत’ परिवारानेही आपले अनेक सदस्य गमावले आहेत. या अडचणीच्या काळात ‘लोकमत’ने कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्या सदस्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठीण काळात अडचणीत सापडलेल्यांसाठी हा प्रयत्न लाभदायक ठरेल, अशी मला आशा आहे.
- करण दर्डा, संपादकीय संचालक व कार्यकारी संचालक, लोकमत समूह
कुटुंब भावना
‘लोकमत’ हा केवळ वृत्तपत्र समूह नसून हे एक कुटुंब आहे, याच भावनेतून कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या कुटुंबीयांना भविष्याची ग्वाही देण्याचा हा कृतिशील प्रयत्न आहे.