सिंचन तपासाची कालमर्यादा अनिश्चित - राज्य शासन
By Admin | Published: July 19, 2015 01:59 AM2015-07-19T01:59:10+5:302015-07-19T01:59:10+5:30
सिंचन घोटाळ्याचा तपास एसीबी करत असून, हा तपास कधी संपेल हे आताच सांगता येणार नसल्याचे राज्य शासनाने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
मुंबई : सिंचन घोटाळ्याचा तपास एसीबी करत असून, हा तपास कधी संपेल हे आताच सांगता येणार नसल्याचे राज्य शासनाने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
या प्रकरणी मयांक गांधी यांनी जनहित याचिका केली आहे. राज्यातील काही सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळा झाला असून, त्याची एसीबीकडून चौकशी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्याची दखल घेत राज्य शासनाने याची एसीबीकडून खुली चौकशी करणार असल्याचे गेल्या वर्षी न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे आता ही याचिका निकाली काढावी, अशी मागणी करणारा अर्ज एफ.ए. कंपनीने केला आहे. गांधी यांच्या याचिकेत ही कंपनी प्रतिवादी आहे. या कंपनीलाही सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे.
न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यात कंपनीकडून अॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी याआधीही न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र शासनाने याची खुली चौकशी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संबंधित याचिका न्यायालयाने निकाली काढल्या. मात्र गांधी यांची याचिका अजून प्रलंबित आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी, ही गांधी यांची मागणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही याचिका आता निकाली काढावी, अशी विनंती अॅड. साखरे यांनी केला.
यावर गांधी यांच्या वकिलाने आक्षेप घेतला. तसेच याचा तपास कधीपर्यंत पूर्ण होईल, असा सवाल खंडपीठाने राज्य शासनाला केला.