नवीन काही घडताना... इस्लाममधील अंधश्रद्धांना विरोध करणारा ‘तिमिरभेद’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 10:37 AM2024-02-04T10:37:53+5:302024-02-04T10:38:20+5:30
खुद्द मुस्लिम समाजातून जे प्रयत्न होतात, ते विशेष लक्षवेधक ठरतात.
दिनकर गांगल
‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना हमीद दलवाई यांनी केली, त्यास पन्नास वर्षे उलटून गेली. त्यानंतरच्या मुस्लिम धर्मसुधारकांनी ती चळवळ सतत जागती ठेवली आहे - त्यातील एक महत्त्वाचा भाग असतो अंधश्रद्धा निर्मूलनाचा. त्यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी जो मार्ग अनुसरला आणि त्यातून ज्या कायदेशीर तरतुदी निर्माण झाल्या, त्यांचा फायदा मुस्लिम धर्मसुधारकांनाही होत असतो. पण, त्या पलीकडे खुद्द मुस्लिम समाजातून जे प्रयत्न होतात, ते विशेष लक्षवेधक ठरतात.
शमसुद्दीन तांबोळी हे निवृत्त प्राध्यापक ‘सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी ‘तिमिरभेद’ नावाच्या ‘अंधश्रद्धाविरोधी मंचा’ची स्थापना १८ जून २०२१ ला केली. उम्मीद शेख नावाचे प्राध्यापक मंचाची जबाबदारी सांभाळत. त्यांनी अंधश्रद्धा कशास म्हणावे, यासाठी सहा निकष निश्चित केले आहेत. त्यांचे वर्णन कार्यकारण भावाचा अभाव, मानसिक गुलामगिरी, संविधानात्मक कर्तव्यांना बाधा, कायदा-सुव्यवस्थेचा उपमर्द, मूलभूत कर्तव्यांची पायमल्ली आणि कालबाह्य परंपरांचे अंधानुकरण असे करता येईल. साहिद शेख नावाचा तरुण तडफदार कार्यकर्ता आता मंचाचे कामकाज पाहतो. ‘तिमिरभेद मंचा’ने गेल्या तीन वर्षांत बऱ्याच चर्चा व प्रशिक्षण कार्यक्रम घडवून आणले आहेत. स्वत: शमसुद्दीन तांबोळी यांनी ‘तिमिरभेद’ नावाच्या पुस्तकात ‘मुस्लिम अंधश्रद्धांचा धांडोळा’ घेतला आहे. त्यातून पहिली गोष्ट ठसठशीतपणे स्पष्ट होते, की अंधश्रद्धा हा प्रश्न धार्मिक नसून सांस्कृतिक आहे. त्यामुळे पुस्तकातून मुस्लिम समाजातील ज्या अंधश्रद्धा प्रकट होतात, त्या हिंदू समाजात तशाच्या तशा फक्त वेगळ्या नावाने दिसून येतात. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या दहा-बारा दिवसांत मुस्लिम समाजात जे विधी व समारंभ केले जातात ते तसेच्या तसे हिंदू समाजात आढळतात किंवा मुसलमानांतील मुलाची सुंता ही कित्येक वेळा हिंदूंतील मुंजविधीइतकी
थाटामाटात व समारंभपूर्वक केली जाते. पुस्तकात एक विधान आहे, की मुस्लिम व ख्रिस्ती समाजांत पंधराव्या शतकापर्यंत अंधश्रद्धा सारख्याच प्रबळ होत्या. त्यानंतर युरोपात विज्ञानाचा प्रसार झाल्याने ख्रिस्ती समाजात अंधश्रद्धांचे प्रमाण बरेच कमी झाले, परंतु मुस्लिम समाज शिक्षणाअभावी रूढींचा अधिकाधिक बंदिवान होत गेला.
‘भूत’ नावाची गोष्ट सर्व संस्कृतींत आदिजीवनापासून चालत आलेली आहे. अरबी लोककथांत ‘घोल’ म्हणजे नरपिशाच्च आणि ‘गुलाह’ ही त्याची मादी म्हणून उल्लेख येतात. सुष्ट पिशाच्चाला ‘जीन’ म्हणतात तर दुष्टाला ‘सैतान’. इब्लिस किंवा सैतान हा भूताचा बाप असतो आणि मारिया ही त्याची आई. इस्लामचा प्रसार इराण, आफ्रिका, तुर्कस्थान व भारत अशा देश-प्रदेशांत झाला तेव्हा त्यांना संस्कृतीनुसार वळण कसे लागले याचे त्रोटक विवेचन पुस्तकात येते (बेनझीर तांबोळी), पण ते फार बोलके आहे. भूत उतरवण्याचे प्रकार जास्त करून दर्ग्यात होतात. काही दर्गे त्याकरता प्रसिद्ध आहेत. ‘तिमिरभेद’ या पुस्तकात विविध लेखकांनी लिहिले आहे. ते जास्त करून मुस्लिम लेखक आहेत. शेवटचा, सोळावा लेख म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या ‘एक शून्य मी’ पुस्तकातील उद्धृत आहे. त्यातील एक वाक्य येथे नमूद करावेसे वाटते - “आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर देश अधिक सुखी झाला असता.”