चिंचोळ्या गल्ल्यांतून मार्ग काढणार छोटे बंब
By admin | Published: November 3, 2016 01:56 AM2016-11-03T01:56:24+5:302016-11-03T01:56:24+5:30
अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या गल्ल्यांतून आगीचे बंब घटनास्थळी नेण्यास अग्निशमन दलास अनंत अडचणी येत असतात.
मुंबई : अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या गल्ल्यांतून आगीचे बंब घटनास्थळी नेण्यास अग्निशमन दलास अनंत अडचणी येत असतात. यामुळे अग्निशमन दलाची मदत पोहोचण्यास उशीर होऊन अनर्थ ओढावू शकतो. म्हणून आगीचे छोटे बंब आणण्याची कल्पना दोन वर्षांपूर्वी पुढे आली होती. बराच काळ लालफितीत अडकलेला हा प्रस्ताव अखेर नवीन वर्षात मार्गी लागणार आहे. त्यानुसार, मिनी फायर टेंडर म्हणजेच आगीचे छोटे १७ बंब जानेवारीपर्यंत अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.
काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले. एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या इमारती व अरुंद मार्गामुळे अग्निशमन दलावरच ही आपत्ती ओढावली़ याची गंभीर दखल घेऊन पालिकेच्या विशेष समितीने छोटे अग्निशमन केंद्र उभारण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, आगीचे छोटे बंब खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी पालिका तब्बल ४२ कोटी रुपये खर्च करणार आहे.
काळबादेवी दुर्घटनेच्या आधीपासून मिनी फायर टेंडरचा प्रस्ताव चर्चेत होता. मात्र, हा प्रस्ताव प्रत्यक्षात स्थायी समितीपुढे येण्यास दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटला. पहिल्या टप्प्यात तीन छोटे बंब खरेदी करण्यात येणार आहेत. हे बंब चिंचोळ्या गल्ल्यांमधून रस्ता काढू शकतात. झोपडपट्टी व विशेषत: दक्षिण मुंबईतील इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास, या बंबाच्या मदतीने चिंचोळ्या मार्गांतून रस्ता काढणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)
छोट्या बंबाचे फायदे
अरुंद रस्ते व चिंचोळ्या गल्ल्यातून घटनास्थळी पोहोचू शकेल. या इंजिनमध्ये असलेल्या तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे भिंतीसारखा अडथळाही दूर होऊ शकतो. अनेक वेळा आग बंद ठिकाणी लागल्यास ज्वालांपर्यंत पाणी जाण्यास अडथळा येतो. अशा वेळी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.
पाणी साठविण्याची क्षमता या इंजिनमध्ये कमी असली, तरी त्यात मोठ्या बंबाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन दलाच्या ताफ्यात केवळ अडीच हजार अधिकारी व जवान आहेत. ही यंत्रणा तोकडी पडत असून, वाहतुकीची कोंडी, चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद रस्त्यांनी त्यांच्या समस्येत भर घातली आहे.
म्हणूनच सहा कमांडिंग सेंटर्स सुरू केल्यानंतर, आता मिनी फायर टेंडर खरेदी करण्यात येणार आहेत.