टायरअभावी १२ बस धूळखात
By admin | Published: August 4, 2016 01:50 AM2016-08-04T01:50:07+5:302016-08-04T01:50:07+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या भोंगळ कारभारामुळे महिनाभरापासून सात बस टायरविना धूळखात आहेत
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या भोंगळ कारभारामुळे महिनाभरापासून सात बस टायरविना धूळखात आहेत. नवीन टायर खरेदी लालफितीत अडकल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी, महिनाभरात सुमारे २५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.
जेएनएनयूआरएम योजनेतून मीरा-भार्इंदर महापालिकेस मिळालेल्या बसचे उद्घाटन गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. सध्या परिवहन सेवेच्या ताफ्यात ४४ बस आहेत. त्यात १० मिनी, तर ३४ मोठ्या आकाराच्या बस आहेत. टाटा मोटर्सकडून खरेदी केलेल्या या बस सध्या वॉरंटी काळात असल्या तरी टायरचा यात समावेश नाही. बहुतांश बस ६० हजार किलोमीटर धावल्या असून त्यांचे टायर झिजून खराब झाले आहेत, तर काही फुटले आहेत.
परिवहन सेवा सध्या महापालिकाच चालवत असून टायरसह अन्य आवश्यक बाबींचा पुरवठा वेळेवर करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. परंतु, प्रशासनाची परिवहन सेवेबद्दलची अनास्था व ढिसाळ कारभार सातत्याने समोर येत आहे. यामुळे बसची दुरवस्था होऊन त्यांचे आयुष्य कमी होत आहे. शिवाय, पालिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागून प्रवाशांना समाधानकारक सेवा देण्यात पालिका प्रशासन व सत्ताधारी अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. दीड महिन्यापासून नवीन टायर खरेदीअभावी सात बस प्लेझंट पार्क येथील आगारात धूळखात आहेत. यामध्ये तीन मिनी, तर चार मोठ्या आकाराच्या बसचा समावेश आहे. काही टायर काढून अन्य बसना लावून शक्य तेवढ्या जास्त बस सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या तातडीने मोठ्या बसचे सुमारे ३५ तर, मिनी बसचे २५ टायर तरी खरेदी करणे गरजेचे आहे. टायर पंक्चरचे कामही खर्चिक असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सात बस महिनाभरापासून टायरअभावी बंद आहेत. महिन्याला सुमारे २५ लाखांच्या उत्पन्नावर पालिकेला पाणी सोडावे लागत आहे. (प्रतिनिधी)