भातसाच्या रक्षकांचे वेतन ७ महिने थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 03:38 AM2016-10-17T03:38:49+5:302016-10-17T03:38:49+5:30
सुरक्षारक्षक महामंडळाच्या ७ कर्मचाऱ्यांना मार्च २०१६ पासून वेतनच न मिळाल्याने कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला
भातसानगर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची सुरक्षा करण्यासाठी आधीच पोलीस व कर्मचारी कमी असताना सध्या धरणावर असलेल्या सुरक्षारक्षक महामंडळाच्या ७ कर्मचाऱ्यांना मार्च २०१६ पासून वेतनच न मिळाल्याने कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला आहे. यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही तो प्रतिसाद न मिळाल्याने मोठा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या या धरणाची सुरक्षा हीदेखील महत्त्वाची आहे. यासाठी पूर्वी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नेहमी सुरक्षेसाठी तैनात असत. तसेच सुरक्षारक्षक मंडळ, मुंबई यांचेदेखील ३० खाजगी सुरक्षारक्षक तैनात असत. मात्र, मागील काही महिन्यांपासून धरणाच्या सुरक्षेसाठी शहापूर पोलीस ठाण्याचे ३, तर मंडळाचे केवळ ७ कर्मचारी सुरक्षा करीत आहेत.
या ७ कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे काम हे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता करीत असतात. मात्र, मार्च २०१६ पासून त्यांना वेतन मिळाले नाही.
याबाबत, त्यांनी कार्यकारी अभियंता दुसाने यांना पत्रव्यवहार करून आपले थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. ते देण्यासाठी विशेष अशी तरतूद केली जात नसल्याने या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही दुसाने यांनी सांगितले. तसेच तो मिळण्यासाठीचा पत्रव्यवहार वरिष्ठांना केला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आपला पगार लवकर होवो, या आशेकडे हे कामगार डोळे लावून बसले आहेत. (वार्ताहर)
>सुरक्षा अत्यंत महत्त्वाची
मुंबई-नाशिक महामार्गावरून अवघ्या ६ किमी अंतरावर असणारे हे भातसा धरण अतिसंवेदनशील असे क्षेत्र आहे. या धरणातून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या या धरणाची सुरक्षा महत्त्वाची आहे.