अतिव्यस्ततेमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा

By Admin | Published: April 23, 2015 05:42 AM2015-04-23T05:42:29+5:302015-04-23T05:42:29+5:30

मुख्यमंत्री झाल्यापासून दररोज चार-चार कार्यक्रम, अर्धा डझन बैठका, शेकडो अभ्यागतांच्या गाठीभेटी, रात्री दोन वाजेपर्यंत फाइल्स हातावेगळ्या करणे

Tired of the Chief Minister due to excessive power | अतिव्यस्ततेमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा

अतिव्यस्ततेमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा

googlenewsNext

मुंबई : मुख्यमंत्री झाल्यापासून दररोज चार-चार कार्यक्रम, अर्धा डझन बैठका, शेकडो अभ्यागतांच्या गाठीभेटी, रात्री दोन वाजेपर्यंत फाइल्स हातावेगळ्या करणे या सगळ्या व्यापामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताण आला असून, आज त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याने अनेक बैठका रद्द झाल्या आणि त्यांच्या भेटीकरिता आलेल्यांना हात हलवत परतावे लागले.
गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांचा घसा बसला आहे. त्यांना बोलताना त्रास होतो. तो सहन करून ते दौरे करीत आहेत. परदेशातून परतताच नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणूक, नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरून त्यांनी भाषणे दिली.
मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यांचा बसलेला आवाज पाहून मंत्र्यांनीही चिंता व्यक्त केली; पण त्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी बैठक पूर्ण केली व नंतर पत्रकार परिषद घेऊन ते सोलापूर आणि पुण्याच्या दौऱ्यावर गेले. पुण्यात वसंत व्याख्यानमालेत त्यांचे भाषण झाले. आज सकाळी १० वाजताचा जाहीर कार्यक्रम आटोपल्यानंतर मंत्रालयात बैठकी, सायंकाळी वर्षावर गाठीभेटी असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम होता. पण सकाळी त्यांना घशाच्या त्रासाबरोबरच किंचित तापही जाणवू लागला आणि पवईतील हिरानंदानी इस्पितळ गाठून त्यांनी नियमित चाचण्या करून घेतल्या.
डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे ते दिवसभर वर्षा बंगल्यावरच होते. तरीही दुपारी ३ पर्यंत फायली मंजूर करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा, भाजपाच्या काही नेत्यांशी चर्चा हे करण्यात दुपारचे ३ वाजले आणि नंतरच त्यांना विश्रांती घेता आली. अतिव्यस्ततेमुळे मुख्यमंत्र्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होते. कार्यकर्ते, स्नेही, महत्त्वाच्या संस्था, व्यक्तींचा आग्रह न मोडता ते अनेक कार्यक्रम स्वीकारतात.
याशिवाय कार्यालयीन कामकाज, अधिकाऱ्यांच्या बैठकी, चर्चा, सहकारी मंत्री, भाजपाचे नेते यांच्यासोबतच्या बैठकी हे सतत सुरू असते. फडणवीस यांचे निकटस्थ सांगतात, की रात्री २ पर्यंत ते काम करीत असतात. सकाळी ७ ला उठून त्यांचा दिवस सुरू होतो. गेले कित्येक दिवस त्यांना पुरेशी झोप मिळालेली नाही. त्यांचा व्यायाम थांबला आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Tired of the Chief Minister due to excessive power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.