लॉकडाऊनला कंटाळलात, शेतावर जा... मौजमज्जा करा
By यदू जोशी | Published: September 18, 2020 01:34 AM2020-09-18T01:34:09+5:302020-09-18T01:35:39+5:30
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून कृषी पर्यटनाला पहिल्यांदाच राजाश्रय मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच यासंबंधीच्या धोरणास मान्यता दिली.
- यदु जोशी
मुंबई : कोरोनानंतरच्या इतक्या महिन्यांच्या लॉकडाऊनला कंटाळलात, आता निसर्ग तुम्हाला खुणावतोय? मग आता शासनाच्या नव्या धोरणानुसार शेतावर जा, विटी-दांडू, हुतूतू, लंगडी खेळा, मस्त झोके घ्या, खिल्लारी बैलांची जोडी असलेल्या बैलगाडीत फिरा. खास मºहाटी किंवा इतर मनपसंत पदार्थांवर ताव मारा आणि जमलं तर मुक्कामही करा. राज्यात लवकरच ठिकठिकाणी कृषी पर्यटन केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून तेथे तुम्हाला हा आनंद लुटता येईल.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून कृषी पर्यटनाला पहिल्यांदाच राजाश्रय मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच यासंबंधीच्या धोरणास मान्यता दिली. कृषी पर्यटन केंद्रांमध्ये पोवाडा, गोंधळ, जागरण, लेझीम, भजन-कीर्तन, आदिवासी नृत्याची मेजवानी असेलच शिवाय बलुतेदार, अलुतेदार, वासुदेव, डोंबारी, बहुरूपी ही ग्रामीण जीवनाची वैशिष्ट्येही तुम्हाला अनुभवता येतील. लहान मुलांसाठी खेळ, साहसी खेळ, ग्रामीण खेळांची सोय असेल. शेतमालाच्या उत्पादनाच्या जोडीने हे केंद्र चालवावे लागेल आणि पर्यटकांना तेथील कृषी उत्पादने विकत घेण्याचीही व्यवस्था
असेल. पर्यटन केंद्र हे त्यांच्यासाठी जोड व्यवसाय ठरेल.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची किमान एक सहल
या ठिकाणी आयोजित करणे शाळांना अनिवार्य असेल. वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, खासगी किंवा शासकीय कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे आणि शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदारी संस्था किंवा कंपनीस या केंद्राची उभारणी करता येईल. काही खासगी व्यक्ती, संस्थांची केंद्रे राज्यात सुरू आहेत, पण या संकल्पनेला पहिल्यांदाच राजाश्रय लाभणार आहे. वर्षाअखेर ही केंद्रे सुरू होतील.
तुम्ही उभारू शकता केंद्र
शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात असे पर्यटन केंद्र उभारता येईल. त्यासाठीचे नोंदणी शुल्क २,५०० रुपये असेल. दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागेल आणि त्याचे शुल्क केवळ एक हजार रुपये राहील. नोंदणी पर्यटन विभागाकडे करावी लागेल. कमीत कमी एक एकर जागेवर ते उभारता येईल. सहलींचे आयोजन करायचे तर किमान पाच एकर शेती असणे ही अट राहील. कृषी पर्यटन केंद्र चालकांना आदरातिथ्यापासून आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.