कर्जाच्या जाचाला कंटाळला, एकमेकांना मिठी मारत शेतकऱ्याने कुटुंबासह प्यायलं विष
By Ajay.patil | Published: April 6, 2023 05:13 PM2023-04-06T17:13:01+5:302023-04-06T17:24:37+5:30
शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू : पत्नी व मुलाची प्रकृतीही गंभीर ; एकमेकांना मिठी मारत, केले विषप्राषण
जळगाव - जेमतेम शिल्लक असलेली जमीन, त्यात अतीवृष्टीमुळे कमी आलेले उत्पन्न, घरात बेरोजगारीने त्रस्त झालेला मुलगा , त्यातच कुंटूंबाचा गाडा हाकलण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होवू न शकल्याने गुरुवारी सकाळी ७.३० वाजता जळगाव तालुक्यातील वडली येथील एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसोबत विषप्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर पत्नी व मुलाची प्रकृती देखील गंभीर आहे.
तालुक्यातील वडली येथील शेतकरी नारायण दंगल पाटील (वय ६६) हे पत्नी भारती नारायण पाटील (वय ६०) व मुलगा गणेश नारायण पाटील (वय २४) यांच्या समवेत वास्तव्याला आहेत. नारायण पाटील यांची गावात जेमतेम शेती आहे. तर पारोळा तालुक्यातील बावटे येथे थोडी जमीन आहे. त्यातुन आलेल्या थोड्या उत्पन्नातून नारायण दंगल पाटील हे आपल्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. मोठा मुलगा गणेश हा गावातच राहत असून, तो बेरोजगार आहे. तर लहान मुलगा मयुर हा नाशिक येथे खासगी रुग्णालयात कामाला आहे. दोन्ही मुलं अविवाहीत आहेत. अशा परिस्थितीत कुंटूंबाचा गाडा हाकलण्यासाठी नारायण पाटील यांनी कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड होत नसल्याने त्या कर्जाच्या जाचातून त्यांनी आत्महत्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली.
एकमेकांना मिठी मारत, केले विषप्राषण
गुरुवारी सकाळी ७.३० वाजता हा प्रकार उघडकीस आला. नारायण पाटील यांचा पुतण्या शामकांत पाटील हा गावातच वास्तव्याला असतो. त्याला सकाळी गणेश पाटील याने फोन करून, घरी येण्याची विनंती केली. गणेश हा फोनवर रडत असल्याने शामकांत पाटील यांनी घाईतच आपले भाऊ संतोष व रमेश पाटील यांना सोबत घेवून, नारायण पाटील यांचे घर गाठले. घरात प्रवेश केल्यानंतर समोरच शेतकरी नारायण पाटील आपल्या व मुलासोबत मिठी घेवून अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. त्यांनी विषप्राषण केल्याचे संतोषच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ तिघांना खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यात उपचारादरम्यान नारायण पाटील यांचा मृत्यू झाला. तर मुलगा गणेश व पत्नी भारती यांची प्रकृती गंभीर आहे.