थकलेल्या पोलिसांना गावाकडची ओढ
By admin | Published: October 21, 2014 12:07 AM2014-10-21T00:07:29+5:302014-10-21T00:07:29+5:30
बंदोबस्त संपला : पहिलीच दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणार
एकनाथ पाटील - कोल्हापूर-- टोल आंदोलन, मोर्चे, दंगली यासह लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बंदोबस्तामुळे पोलिसांची दमछाक झाली आहे. ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करत कोणत्याच सणा-सुदीला त्यांना घराकडे जाता आले नाही. आई-वडिलांसह पत्नी, मुलांचे स्वास्थ्य हरवले आहे. निवडणूक बंदोबस्त संपल्याने या चेहऱ्यांना गावाकडची ओढ लागून राहिली आहे. तोंडावर आलेली दिवाळी कुटुंबात सहभागी होऊन साजरी करण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सुट्ट्यांचे नियोजन करून ‘मागेल त्याला सुटी’ देण्याचे नियोजन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केले आहे.
‘पप्पा, आजचा दिवस तरी घरी थांबा ना...’ ही चिमुकल्यांची आर्त हाक. रात्री कामावरून परतणाऱ्या पप्पांची वाट पाहता...पाहताच केव्हा झोप लागते हे त्यांनाही कळत नाही. सकाळी पिल्लांना शाळेची घाई आणि वडिलांना कामावर जाण्याचे वेध यात बाप-लेकाला हवाहवासा वाटणारा सहवासही मिळत नाही, आयुष्याच्या जोडीदारासोबत विसाव्याचे दोन क्षण घ्यावे म्हटले तरी ते मिळत नाहीत. मग यातूनच अपेक्षाभंग आणि संसारातील वादावादी सुरू होते. दुसऱ्यांच्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम पोलीस करतात. परंतु स्वत:च्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मात्र त्यांना वेळ भेटत नाही. प्रत्येक घरातील समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम पोलीस करत असतात. परंतु त्यांच्या घरातील समस्या मात्र तशाच राहतात. रात्री-अपरात्री आलेला प्रत्येक फोन उचलून समोरच्यांची तक्रार ऐकून त्याला दिलासा देण्याचे काम करतात. परंतु घरातून फोन आला की ‘मी कामात आहे, फोन ठेवतो’, असे सांगून प्रामाणिकपणे काम करताना पोलीस दिसत आहेत.
गुन्हे उकलण्याबरोबर वर्षभरात टोल आंदोलन, मोर्चे, निदर्शने, सणासह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांमुळे पोलिसांना क्षणभर विश्रांतीही घेता आलेली नाही.
सध्या सर्वसामान्य नागरिक दिवाळीच्या खरेदीमध्ये व्यस्त आहेत. सुटीमध्ये मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याचेही काहीजण प्लॅनिंग करत आहेत. पोलिसांना मात्र गावकडची ओढ लागली आहे. ही दिवाळी कुटुंबाबरोबर साजरी करण्याचे स्वप्न प्रत्येक पोलिसाचे आहे.
त्यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे रजा अर्जही सादर केले आहेत. डॉ. शर्मा यांनी सुट्ट्यांचे नियोजन करून ‘मागेल त्याला सुटी’ देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आपल्या त्यागाची दखल घेणारा कोणी तरी आहे याची जाणीव पोलिसांना होत आहे.
कधीही न संपणारी ड्युटी पोलिसांची आहे. वर्षभरात पोलिसांनी खूप प्रामाणिकपणे काम केल्याने गणेशोत्सव, आंदोलनासह निवडणुका शांततेत पार पडल्या. आता काहीक्षण आनंदाचे पोलिसांना मिळावेत, ही माझी इच्छा आहे.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक