छेडछाडीला कंटाळून विदयार्थिनीने घेतले जाळून
By admin | Published: September 30, 2016 06:19 PM2016-09-30T18:19:33+5:302016-09-30T18:19:33+5:30
सततच्या छेडछाडीस वैतागून एका विदयार्थिनीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही घटना माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे शुक्रवारी उघडकीस आली.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ३० : सततच्या छेडछाडीस वैतागून एका विद्यार्थिनीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही घटना माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे शुक्रवारी उघडकीस आली.
वैष्णवी विष्णू शेरकर (१४ रा. देवखेडा) असे त्या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माजलगाव येथील मोरेश्वर विद्यालयात ती नववीच्या वर्गात शिक्षण घेते. देवखेडा हे माजलगावपासून दोन किमी अंतरावर असून ती पायी जाणे - येणे करते. एक तरुण तिची सतत छेड काढतो. त्यामुळे ती निराश झाली होती. या छेडछाडीस तिने गुरुवारी रात्री राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ती गंभीररित्या भाजली. तिला माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले.
पोलिसांचा हलगर्जीपणा!
वैष्णवीचा माजलगाव शहर पोलिसांनी अद्यापपर्यंत जवाब घेतला नाही. नातेवाईकांनी छेडछाडीमुळेच तिने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. निरीक्षक सहायक निरीक्षक सुनील अंधारे यांच्याशी संपर्क केला असता मी बैठकीत असल्याचे सांगून त्यांनी अधिक माहिती देणे टाळले.