तिरुपती पूजेसाठीचा लढा दोन वर्षांनंतर जिंकला
By admin | Published: March 30, 2016 12:42 AM2016-03-30T00:42:00+5:302016-03-30T00:42:00+5:30
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी तक्रारदार सुरेश रामेश्वर सोनी यांना ९० दिवसांच्या आत ‘मेलछाट वस्त्रम’ ही विशेष अर्जित सेवा पूर्वीच्याच जमा
औरंगाबाद : तिरुमला तिरुपती देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी तक्रारदार सुरेश रामेश्वर सोनी यांना ९० दिवसांच्या आत ‘मेलछाट वस्त्रम’ ही विशेष अर्जित सेवा पूर्वीच्याच जमा असलेल्या शुल्कावर, अतिरिक्त शुल्क न आकारता उपलब्ध करून द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.
औरंगाबादेतील सुरेश सोनी यांनी तिरुपती देवस्थानातील ‘मेलछाट वस्त्रम’ या विशेष अर्जित सेवेकरिता २० सप्टेंबर २००९ रोजी शुल्क डीडीद्वारे पाठविले होते. त्यांना सदर सेवेची तारीख २१ फेब्रुवारी २०१४ असल्याचे मंदिर प्रशासनाने कळविले होते. सोनी पत्नीसह १९ फेब्रुवारी २०१४ला तिरुपतीला रेल्वेने गेले. तिथे त्यांच्या माहितीची व ओळखपत्राची खात्री करून त्यांच्या अंगठ्याचा ठसा व फोटो घेतला. तपासणी पूर्ण झाल्यामुळे सोनी यांना रामबाग येथे रूम देण्यात आली. सेवेसाठीचे चलनही देण्यात आले. सूचनेनुसार सोनी हे २१ फेब्रुवारी २०१४ रोजी पहाटे २.३० वाजता ‘मेलछाट वस्त्रम’ सेवेसाठी पोहोचले; परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले. तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांसोबत योग्य वेळेत संपर्क साधला नसल्यामुळे ‘ती’ सेवा करता येणार नाही. तक्रारदाराने २५ टक्के जास्तीची रक्कम दिल्यास त्यांना सदर सेवेकरिता पुढील तारीख देता येऊ शकेल, असे सांगण्यात आले. शुल्क भरूनही सोनी यांना सेवेपासून वंचित ठेवल्याबाबत त्यांनी औरंगाबादेतील तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)
- गैरअर्जदारांनी तक्रारदारास औरंगाबाद ते तिरुपतीपर्यंत जाण्या-येण्यासाठी यापूर्वी त्यांनी केलेल्या खर्चाच्या भरपाईपोटी ९० दिवसांत ३० हजार रुपये द्यावेत, असेही मंचाने आदेशात म्हटले आहे. तब्बल दोन वर्षांच्या लढ्यानंतर या भाविकाला न्याय मिळाला.