तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांचा ‘टिवटिवाट’

By Admin | Published: June 27, 2017 01:50 PM2017-06-27T13:50:15+5:302017-06-27T14:20:04+5:30

तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांनी ट्विटरचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे.

'Tivitivat' for Railway passengers for complaints | तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांचा ‘टिवटिवाट’

तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांचा ‘टिवटिवाट’

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत/ संतोष हिरेमठ

औरंगाबाद, दि. 27-  रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, बोगींमध्ये अस्वच्छता आणि इतर सोयी-सुविधांच्या अभावामुळे रेल्वे प्रवास अवघड होतो. काही वर्षांपूर्वी या समस्यांच्या तक्रारींसाठी कागदोपत्री पत्रव्यवहार करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात बराच वेळ जात असल्याने शक्यतो प्रवासी त्या भानगडीत पडत नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांनी ट्विटरचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. त्यातून महिनो-न्-महिने न सुटणाऱ्या समस्या काही वेळेत निकाली लागण्यास मदत होत आहे. 
 
सोशल मीडियाचा वापर आज केवळ स्वत:ची छायाचित्रे टाकण्या पुरताच राहिलेला नाही. या माध्यमाचा वापर करून सकारात्मक बदल घडविला जात आहे. काही महिन्यांपूर्वी निवडणुकांच्या निकालाने सोशल मीडियाचे महत्त्व समोर आले होते. त्याप्रमाणे आता प्रत्येक क्षेत्रातही त्याचा वापर वाढत आहे. रेल्वे प्रवासीही त्यामध्ये मागे नाही. सर्वसामान्यांना किफायतशीर प्रवासासाठी रेल्वेचा मोठा आधार मिळतो. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेकदा गैरसोयींना सामोरे जावे लागते. अशावेळी सोशल मीडियामुळे ऐन प्रवासातही या समस्या सहन करण्याऐवजी त्यास वाचा फोडणे शक्य झाले आहे.
 रेल्वे प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ‘ट्विटरची मदत घेण्याकडे अलीकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. आजघडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करून रेल्वेच्या समस्या अधिकाऱ्यांपासून थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. यातून प्रवाशांच्या अडचणींची तात्काळ दखल घेतली जाते. त्यामुळे समस्या, अडचणी काही वेळेतच मार्गी लागतात. समस्यांबरोबर नवीन रेल्वे सोडणे, बोगी वाढविणे, रेल्वेचा विस्तार करणे अशा विविध मागण्याही टिष्ट्वटरवरून केल्या जात आहे. त्यास रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रतिदास मिळून त्यासंदर्भातील उत्तर दिले जातात.
 
रेल्वे प्रवाशांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून कशी मदत मिळाली, याची काही उदाहरणे.
ट्विटनंतर निघाले चोकअप
औरंगाबादेतील रेल्वेस्टेशनवर २८ नोव्हेंबर २०१६ रोजी विश्रामगृहातील अस्वच्छ आणि तुंबलेल्या स्वच्छतागृहाच्या तक्रारीकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशाने या प्रकाराची थेट रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची रेल्वे मंत्रालयाने गंभीर दखल घेतल्याने स्थानिक अधिकारी-कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. अवघ्या काही वेळत युद्धपातळीवर स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली.
 
रेल्वेस्टेशनवर स्वच्छतेकडे दुर्लक्ष
रेल्वेस्टेशनवरील स्वच्छतेकडे सहा महिन्यांपासून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ८ जून रोजी ट्विटरवरून थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली. रमेशचंद्रा झा यांनी ट्विटद्वारे ही तक्रार केली. रेल्वेस्टेशनवरील अस्वछतेचे छायाचित्र काढून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विटरवरून पाठविण्यात आले. या तक्रारीची दखल घेत रेल्वेमंत्रालयाने यासंदर्भात ‘दमरे’च्या नांदेड विभागास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर  औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील स्वच्छता विभागाला स्वच्छतेची सूचना करण्यात आली.
 
अधिक दराने जेवण
२० जून रोजी तपोवन एक्स्प्रेसमधून रक्षित मेहता हे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या हाती पेंट्री कारमधील जेवणाचे दरपत्रक लागले. या दरपत्रकातील सर्वच खाद्यपदार्थांचे दर हे नियमित दरापेक्षा अधिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ‘आयआरसीटीसी’च्या नियमांकडे दुर्लक्ष करून हे दरपत्रक तयार करण्यात आले होते. याविषयी शंका आल्याने त्यांनी ट्विटरवरुन  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांकडे (डीआरएम) तक्रार केली. डीआरएम ए. के. सिन्हा यांनी तक्रारीची दखल घेत पेंट्री कार चालकावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

Web Title: 'Tivitivat' for Railway passengers for complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.