वाघ जगवायचा, हत्ती पाेसायचा की माणूस वाचवायचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 02:36 PM2024-05-19T14:36:42+5:302024-05-19T14:37:17+5:30
एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत वाघाने १० बळी घेतले आहेत.
राजेश शेगाेकार, वृत्तसंपादक, नागपूर -
वाढत्या वनवैभवामुळे, टायगर कॅपिटल असे बिरूद मिरवण्याचा मान विदर्भाला मिळाला असला तरी मानव वन्यजिवांच्या संघर्षात शेकडाे निरपराध नागरिकांची अडकलेली ‘मान’ साेडवायची कशी, असा प्रश्न आता गंभीर झाला आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत वाघाने १० बळी घेतले आहेत.
भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशात ३,१६७ वाघ आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ४४६ वाघ आहेत. विशेष म्हणजे, विदर्भात वाघांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वाधिक २०६ ते २४८ वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात असून ६२५ चौ. कि. मी. वनक्षेत्रात पसरलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे. वाघांचे हे वैभव जगभरात मिरवत असतानाच स्थानिक पातळीवर मात्र मानव व वन्यजीव संघर्ष माेठा आहे. त्यात आता हत्तींचीही भर पडली आहे.
‘घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. आधीच घरात अनेक जनावरे आहेत, त्यांचीच व्यवस्था नीट हाेत नाही त्यात व्याह्यांकडून थेट घाेडेच सांभाळण्यासाठी पाठविल्यावर व्याह्यांना नाही म्हणता येत नाही अन् त्यांना सांभाळताना नवीनच संकट उभे राहते, अशी विचित्र स्थिती निर्माण हाेते. नेमका असाच अनुभव गडचिराेली, गाेंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना येत आहे. या भागात सरकार नावाच्या व्याह्याकडून घाेड्यांऐवजी थेट हत्तीच पाठविल्याने नव्या संकटाची भर पडली आहे.
काय केल्या आहेत उपाययोजना
चंद्रपूरच्या सीताराम पेठ येथे आभासी भिंतीचा प्रयोग तयार केला. या गावाभोवती सहा कॅमेरे वापरून संरक्षण भिंत तयार केली
मानवासाठी धोकादायक ठरलेल्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावणे, त्याचा मागोवा घेणे, लोकांत जनजागृती
वाघाचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातो.
एकाच वाघाकडून सतत हल्ले होत असतील तर घटनेचे स्वरूप पाहून जेरबंद केले जाते
गस्त घालण्यासाठी गावातील युवकांची प्रायमरी रिस्पॉन्स टिम तयार केल्या.
गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जीसह अनेक योजनांचा अंमल.
४६ हजार काेटींचा फटका
- ग्रामीण भागाची वनांबरोबर असलेली सहजीवनाची भूमिका लोप पावली असतानाच वाघांच्या संवर्धनासाठी १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अमलात आली.
- आज भारतात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांचे संवर्धन झाले. मात्र संघर्षही वाढला. मानव व वन्यजीव संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांना मदतीच्या पाेटी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तब्बल ४६ हजार काेटींचा खर्च राज्य शासनाला करावा लागला आहे.
झुंजीही वाढल्या अन् शिकारीही
मानव-वन्यजीव संघर्षासोबतच वाघांच्या झुंजींत वाढ झाली आहे. यामध्ये वाघांचे मृत्यूही होत आहेत. अलीकडेच ताडोबाच्या बफरमध्ये येत असलेल्या चंद्रपूर वन परिक्षेत्रातील झुंजीत दोन्ही वाघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे वाघांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात लावण्यात येणारे विद्युतप्रवाह हेसुद्धा प्राण्यांच्या जिवावर उठले असून, १० वाघ विद्युतप्रवाहाचे बळी ठरले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात दुहेरी मरण
- मुळातच जंगलव्याप्त गडचिराेली जिल्ह्यात १९८० ते ९० च्या दशकात वाघांचा वावर हाेता. शिकारींमुळे वाघांची संख्या घटली. २०१० पर्यंत वाघांच्या पाऊलखुणाही नव्हत्या.
- चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून वडसा वन विभागात वाघ स्थलांतरित झाले. त्यानंतर २०१९ पासून जिल्ह्यात आरमाेरी वन परिक्षेत्रापासून वाघांच्या हल्ल्यास सुरुवात झाली.
- ऑक्टाेबर २०२१ मध्ये ओडिशातील २५ ते २६ रानटी हत्तींनी छत्तीसगडमधून गडचिराेलीत प्रवेश केला. दीड वर्षापूर्वी हत्ती छत्तीसगड राज्यात गेले हाेते. दाेन वर्षांत वाघाने ११, तर हत्तींनी ९ बळी घेतले आहेत.