Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आज राज्यभरात ‘आॅगस्ट क्रांती’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:54 AM2018-08-09T05:54:48+5:302018-08-09T06:00:00+5:30
मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे.
औरंगाबाद/ मुंबई : मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात दोन वर्षांपूर्वी ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनी झाली होती. मराठा समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे शांततेत काढले.
सरकारने आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. उच्च न्यायालयाने आंदोलन न करण्याचे आवाहन केल्यामुळे या बंदबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर, औरंगाबादेत बुधवारी समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक झाली. ३२ जिल्ह्यांतील समन्वयक उपस्थित होते. चर्चेअंती नियोजित ‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय कायम ठेवण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी पोलीस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंद काळात कुठलाही अनुचिता प्रकार घडू नये, याकरिता अधिक दक्षता घ्यावी, असे त्यांनी या वेळी सांगितले.
>शिक्षकाची आत्महत्या
आरक्षणाअभावी मुलांना नोकरी मिळत नाही नसल्याने लातूर जिल्ह्यातील रमेश पाटील या शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली.
>अहिंसक मार्गाने बंद
अहिंसेच्या मार्गाने बंद पुकारण्यात येणार आहे. वैद्यकीय सुविधा, प्रवासी वाहतूक, अॅम्बुलन्स, शाळेची बस, अशा अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येणार नाहीत. नागरिकांना त्रास होईल, असे वर्तन मराठा क्रांती मोर्चाकडून होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले, तसेच नागरिकांनी मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करण्याचे आवाहनही समन्वयकांनी केले आहे.
>धार्मिक कार्यक्रमांना रोखू नका
बंददरम्यान धार्मिक कार्यक्रमांना जाणाºयांना रोखू नये. मुस्लीम बांधव हज यात्रेला जात आहेत. त्यांचा रस्ता अडवू नये, एसटी महामंडळाच्या गाड्या अडवू नयेत, तोडफोड, जाळपोळ करू नये, असे आवाहनही करण्यात आले.
>१५ आॅगस्टला चूलबंद
मराठा आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. १० आॅगस्टनंतर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाज आंदोलनात जाळपोळ, हिंसा करतो असा आरोप राज्यकर्त्यांनी लावला असल्यामुळे स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला स्वत:लाच आत्मक्लेश करून घेण्यासाठी चूलबंद आंदोलन केले जाणार असल्याचेही समन्वयकांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद, पुणे आणि अमरावती जिल्ह्यातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
>या आहेत मागण्या ।
मराठा आरक्षण द्या । १० आॅगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या । जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करा । आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या