जेएनपीटीतील चौथ्या कंटेनर टर्मिनलचे आज भूमिपूजन
By Admin | Published: October 11, 2015 02:09 AM2015-10-11T02:09:18+5:302015-10-11T02:09:18+5:30
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथील चौथ्या कंटेनर टर्मिनल्सचे भूमिपूजन रविवार, ११ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठी ७९१५ कोटी रुपयांचा
मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथील चौथ्या कंटेनर टर्मिनल्सचे भूमिपूजन रविवार, ११ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठी ७९१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. हे टर्मिनल मार्गी लागल्यास वर्तमान क्षमतेपेक्षा १३0 दशलक्ष टन क्षमता वाढणार असून, हे बंदर भारतातील पहिल्या क्रमांकाचे ठरणार आहे.
नौकावहन मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे टर्मिनल खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. बंदरापासून कंटेनर डेपोपर्यंतची लांबी २ किलोमीटर राहणार असून, यामुळे क्रेन स्थापन करणे सोपे होणार आहे. तसेच यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे ४६ किलोमीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात येत असल्याचेही कुमार यांनी सांगितले.
प्रकल्पाचा पहिला टप्पा २0१७पर्यंत पूर्ण होऊन दुसरा टप्पा २0२२पर्यंत पूर्ण होणार आहे. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर बर्थची एकूण लांबी २ हजार मीटर राहील. पहिल्या टप्प्यातील १ हजार मी. लांबीच्या रस्त्यामध्ये जमीन सुधारणा, क्वे आणि इतर सोयी डिसेंबर २0१७पर्यंत पूर्ण होतील. तर दुसऱ्या टप्प्यातील प्रलंबित कामे डिसेंबर २0२२पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
रस्ते वाहतूक समस्या होणार दूर
सध्याच्या रस्ते वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी बंदर प्रशासनाने स्टेट हायवे ५४ आणि नॅशनल हायवे ४ बी विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा करार एसपीव्ही कंपनी मुंबई आणि जेएनपीटी पोर्ट रोड रेल कंपनी मर्यादित यांच्यामध्ये झाला आहे. या हायवेची एकूण लांबी ४३.९१२ किलोमीटर असणार असून, या प्रकल्पासाठी २९३६ इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामध्ये ३ मोठे, १२ मध्यम पूल, ७ फ्लायओव्हर, १ एलिव्हेटड कॉरिडॉर आणि ८ रस्त्यांवरील पुलांचा समावेश आहे.