आज डॉक्टर्स डे : राज्यात पाच हजार लोकांमागे केवळ एक डॉक्टर !

By admin | Published: July 1, 2017 12:45 PM2017-07-01T12:45:28+5:302017-07-01T12:45:28+5:30

आॅनलाइन लोकमत सोलापूर

Today, Doctor's Day: Only one doctor for every five thousand people in the state! | आज डॉक्टर्स डे : राज्यात पाच हजार लोकांमागे केवळ एक डॉक्टर !

आज डॉक्टर्स डे : राज्यात पाच हजार लोकांमागे केवळ एक डॉक्टर !

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : महेश कुलकर्णी
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आधुनिक उपचार सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असले तरी रूग्ण आणि डॉक्टरांचे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. पाच हजार लोकसंख्येमागे केवळ एक डॉक्टर सेवा देत आहे, हे प्रतिगामत्त्व गोरगरीब रूग्णांच्या हिताचे नसल्याचेच स्पष्ट होत आहे.
डॉक्टर्स डेच्या निमित्ताने शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला असता, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित माहिती दिली. डॉ.सूर्यकांत कांबळे म्हणाले, ग्रामीण भागाचा विचार केला तर अक्षरश: आरोग्य सेवेचे तीन-तेरा वाजल्याचे पाहायला मिळते़ महाराष्ट्रात १९१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत़ १०६९ उपकेंदे्र आणि ३६३ ग्रामीण रुग्णालये आहेत़ दररोज या रुग्णालयातून लाखो रुग्ण उपचार घेतात़ तरीदेखील पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आज आरोग्य सेवा विस्कळीत झालेली दिसून येते़ राज्यात पाच हजार रुग्णांमागे एक डॉक्टर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते पाचशे रुग्णांमागे एक डॉक्टर असायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. कांबळे यांनी सांगितले, मेडिकल आणि शैक्षणिक हब, साखर कारखानदारी, उद्योग नगरी अशी अनेक विशेषणे लावून घेणाऱ्या सोलापूर शहरातील दहा लाख लोकसंख्येमागे केवळ १०० च्या आसपास एमबीबीएस डॉक्टर असल्याचे वास्तव पुढे आले आहे़ अ‍ॅलोपॅथीमधील तज्ज्ञ व अन्य पॅथींच्या डॉक्टरांसह शहरात १५०० डॉक्टर्स रुग्णसेवा करीत आहेत.
------------------
डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे स्मरण
डॉक्टर्स डे सर्वप्रथम १ जुलै १९९१ रोजी साजरा करण्यात आला़ निमित्त होते डॉ़ बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस़ त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय, अनमोल असे योगदान दिले आहे़ त्यांचा जन्म पाटणा (बिहार) येथे १ जुलै १८८२ रोजी झाला़ वयाच्या १४ व्या वर्षी आई वारल्यानंतर त्यांनी वडील प्रकाशचंद्र यांच्या मदतीने हलाखीच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले़ जून १९०१ मध्ये त्यांनी कोलकाता आरोग्य विद्यापीठात वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नोकरी पत्करली़ त्यांच्या मानवतावादी सेवेला सलाम म्हणून भारताने सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने ४ फेब्रुवारी १९६१ साली सन्मानित केले़ त्यांच्या महान कार्याची आठवण म्हणून भारतात डॉ़ बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस हा १ जुलै रोजी डॉक्टर डे म्हणून साजरा करतात़
-------------------
सोलापूर हे मेडिकल हब
सोलापूर हे आता खऱ्या अर्थाने मेडिकल हब झालेले आहे. कर्नाटकातील शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आधुनिक रूग्णसेवा उपलब्ध नसल्याने आणि मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती असल्यामुळे या भागातील रूग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी सोलापुरात येतात. सोलापूर शहरात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अधिक असून, सर्व अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत येथील रूग्णसेवा किफायतशीर आहे. त्यामुळेच मेडीकल हब म्हणून शहराचा लौकिक झाला आहे. किफायतशीर रूग्णसेवा आणखी स्वस्त झाली पाहिजे, अशी रूग्णांच्या नातेवाईकांची अपेक्षा आहे.
-----------------------
सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय खर्च परवडण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णांच्या आवश्यक चाचण्या कराव्यात. जेनेरिक औषधांचा पुरेपूर वापर करण्यात यावा. बालपणापासून यासंबंधीची काय काळजी घ्यावी, याविषयी डॉक्टरांनी समुपदेशन करावे.
- डॉ. सूर्यकांत कांबळे, निवृत्त वैद्यकीय अधिकारी
---------------------------
डॉक्टर्स लोकांची सेवा मनापासून करीत असतात. डॉक्टरांकडून लूट होत आहे अशी कलुषित मानसिकता लोकांची झाली आहे.लोकांनी डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. रूग्णाला बरं करणे हेच डॉक्टरांचं कर्तव्य आहे.
- डॉ. अशोक दोशी, एम.बी.बी.एस. पांजरापोळ चौक.

Web Title: Today, Doctor's Day: Only one doctor for every five thousand people in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.