आज प्रचाराचा धुरळा उडणार!
By admin | Published: February 19, 2017 03:46 AM2017-02-19T03:46:52+5:302017-02-19T03:46:52+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असून, रविवारी सायंकाळी ५ वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवारी
- चेतन ननावरे, मुंबई
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असून, रविवारी सायंकाळी ५ वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार असून, रात्रीपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होईल.
महापालिका निवडणुकीत प्रथमच सर्व प्रस्थापित पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे बहुतेक प्रभागांत तिरंगी किंवा चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. त्यात प्रचाराचा शेवटचा दिवस रविवार असल्याने उमेदवारांनी प्रचाराच्या विविध क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. बहुतेक मतदार घरीच असल्याने त्यांना गाठण्यासाठी उमेदवारांनी गटाध्यक्ष आणि इमारतप्रमुखांचे गट तयार केले आहेत. स्वत: धावती भेट देण्यासाठी काही उमेदवारांनी प्रभागात बाइक रॅलीचे आयोजन केले आहे. शेवटचा प्रहार वाया जाऊ नये, म्हणून रविवारच्या दुपारी आराम न करता कार्यकर्त्यांना पक्षाच्या निवडणूक कार्यालयात जातीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सायंकाळी ५ वाजल्यानंतर अधिकृतरीत्या प्रचारास पूर्णविराम द्यावा लागणार आहे. मात्र याच मोक्याच्या क्षणी मतदारांना आपल्याकडे वळवण्याची व्यूहरचना राजकीय पक्षांनी आखली आहे. मद्यापासून रोकड वाटण्याच्या कामाला याचवेळी सुरुवात होणार आहे. बहुतेक पक्ष कार्यालयांनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दीपोत्सव आणि विविध धार्मिक मंडळांची यादी तयार केली आहे. याशिवाय सोसायटी आणि वसाहतींमधील कमिट्यांनाही संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यात उमेदवारांच्या खास माणसांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मंडळ, संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी संबंधित व्यक्तींना संपर्क साधून आपापला मोबदला मिळवणार असल्याची माहिती आहे.
घरोघरी प्रचार सुरूच राहणार!
राजकीय पक्षांमधील इमारतप्रमुख आणि गटप्रमुखांना घरोघरी छुपा प्रचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सायंकाळनंतर गळ्यात झेंडा नसला, तरी आपल्या निवडणूक चिन्हाबाबत मतदारांना वारंवार आठवण करून देण्यास कार्यकर्त्यांना सांगण्यात आले
आहे. त्यामुळे उघडपणे नव्हे, तर छुप्या पद्धतीने घरोघरी प्रचार सुरू राहणार आहे.
गाडीतून ठेवणार देखरेख!
उघडपणे प्रचारास बंदी असल्याने काही उमेदवारांकडून सायंकाळी गाडीतूनच प्रचार करण्यात येईल. प्रभागात वारंवार चक्कर मारताना मतदारांसोबत संपर्कात राहण्याचे आवाहन उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी करताना दिसतील. याशिवाय मोठ्या लोकसंख्येच्या रहिवासी वसाहतींमध्ये छुप्या बैठका होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियाचे काय?
उघड प्रचार करता येणार नसल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातूनच अफवांनाही पेव फुटते. त्यामुळे पोलिसांसह निवडणूक आयोग
सोशल मीडियावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवणार, हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.
निवडणूक आयोगासमोर आव्हान!
मद्य आणि रोकडवाटप करणाऱ्यांवर देखरेख ठेवतानाच अशा प्रकारांना आळा घालण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर असेल. दरम्यान, छुप्या प्रचारावर करडी नजर ठेवताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारीही आयोगाला घ्यावी लागणार आहे.