"आज मला सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्या;" आंदोलनावर बोलताना आव्हाडांनी सांगितली 'ती' घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 09:05 PM2022-04-08T21:05:39+5:302022-04-08T21:06:16+5:30
सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनादरम्यान सुप्रिया सुळेंनी आंदोलकांची त्यांच्यात जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं उग्र स्वरुप आज पाहायला मिळालं. कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील 'सिल्वर ओक' हे निवासस्थान गाठलं आणि गेटमधून आत प्रवेश करुन चप्पल व दगडफेक केली. याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पोहोचल्या. पण त्यांनाही कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सुप्रिया सुळे वारंवार आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या. तरीही आंदोलक शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावर प्रतिक्रिया देत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यात आपल्याला इंदिरा गांधी दिसल्याचं म्हटलं.
माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी जेएनयूच्या आंदोलनाची आठवण काढली. "१९७७ मध्ये जेव्हा जेएनयूमध्ये आंदोलन झालं तेव्हा निवेदन स्वीकारायला स्वत: इंदिरा गांधी गेटवर गेल्या होत्या. त्यांचे नेते येचुरी होते. हा भारताचा इतिहास आहे. त्या विद्यार्थ्यांसमोर जाताना इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत. आज त्याच इंदिरा गांधी मला सुप्रिया ताईंच्या रुपात दिसल्या. त्या एसटी कामगारांच्या समोर येताना घाबरल्या नाहीत," असं आव्हाड म्हणाले.
"धक्काबुक्की झाली तरी त्या मागे हटल्या नाहीत. शांत बरा चर्चा करूया असं त्या हात जोडून म्हणत होत्या. ज्या स्त्रीच्या शरीरात शरद पवारांचं रक्त आहे, त्या घाबरणाऱ्या नाही. एका ८२ वर्षांच्या व्यक्तीवर, त्यांच्या पत्नीवर ते घरात एकटे असताना, पोलिस बाजूला नसताना हल्ला करणं याची निंदा होईल आणि हे महाराष्ट्रातील लोकांना पटणार नाही याची खात्री आहे," असंही ते म्हणाले.