आजच उरका बँकेची महत्वाची कामे, तीन दिवस राहणार बँका बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 13:46 IST2018-01-25T13:33:35+5:302018-01-25T13:46:14+5:30
तुमची बँकांमधील काही महत्वाची कामे असतील, तर ती आजच पूर्ण करुन घ्या. नाहीतर पुढील ३ दिवस तुमची कामे....

आजच उरका बँकेची महत्वाची कामे, तीन दिवस राहणार बँका बंद
मुंबई - तुमची बँकांमधील काही महत्वाची कामे असतील, तर ती आजच पूर्ण करुन घ्या. नाहीतर पुढील ३ दिवस तुमची कामे रखडतील. याला कारण म्हणजे उद्यापासून सलग ३ दिवस राज्यभरात बँका बंद राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनाला (26 जानेवारी) जोडून चौथा शनिवार व रविवार आल्यामुळे बँका सलग तीन दिवस बंद असणार आहेत. यामुळे बँकिंग व्यवहार होऊ शकणार नाहीत. या तीन दिवसांत बँका बंद असल्याने बँकेतील महत्त्वाची काम आजच पूर्ण करावी लागणार आहेत.
जोडून सुटी आल्यामुळे बाहेरगावी जाण्याचे, पर्यटनस्थळी जाण्याचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांनी काही दिवस आधीच हॉटेल्स, रिसॉर्ट यांचे तसेच रेल्वे, विमान यांचे बुकिंगही केले आहे. मात्र प्रवासादरम्यान हाताशी रोकड असणे सर्वांनाच सोयीचे असते. अशी रोकड पुरेशा प्रमाणात असावी, यासाठी आज, गुरुवारीच बँकांतून ती काढून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मुंबई-गोवा रिटर्न एअर तिकीट तब्बल 26 हजारांवर
मुंबई-गोव्याचं परतीचं विमान तिकीट तब्बल 26 हजार रुपयांवर पोहचलं आहे. तुम्ही जर आतापर्यंत विमान तिकीट बुक केलं नसेल, तर येत्या लाँग वीकेंडचं प्लानिंग तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारीची सुट्टी आणि शनिवार-रविवार असा लागून तीन दिवसांचा लाँग वीकेंड आला आहे. मात्र या दिवसात गोव्याला जाणं तुमच्या खिशाला चाट लावू शकतं.
26 जानेवारीला मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी आणि 28 जानेवारीला परतण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत आहे 26 हजार रुपये. विशेष म्हणजे या विमानांच्या वेळाही अडनिड्या आहेत, म्हणजेच फारशा सोयीस्कर नाहीत. त्यासाठी जाताना तुम्हाला रात्री दहा वाजताचं विमान पकडावं लागेल, तर परतण्यासाठी गोव्याहून भल्या पहाटे 4 वाजता निघावं लागेल.