इच्छुकांची आज मुंबईत समजूत काढणार

By Admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:08+5:302015-12-05T09:07:09+5:30

विधानपरिषदेचे राजकारण : सतेज पाटील, महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे रवाना; अशोक चव्हाणांशी होणार चर्चा

Today, interested seekers will believe in Mumbai | इच्छुकांची आज मुंबईत समजूत काढणार

इच्छुकांची आज मुंबईत समजूत काढणार

googlenewsNext

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधानपरिषदेच्या एका जागेच्या निवडणुकीसाठी इच्छुक चौघांची आज, शनिवारी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसमवेत बैठक होत आहे. कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या सूचनांबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. सकाळी ११ वाजता कॉँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवनात चौघा इच्छुकांशी चव्हाण चर्चा करणार आहेत.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील मुंबईतच आहेत. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री प्रकाश आवाडे शुक्रवारी रात्री मुंबईला रवाना झाले. काँग्रेसची उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय झाला असून इतरांची समजूत काढून बंडखोरी टाळण्यासाठीच पक्षांकडून प्रयत्न सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे.
विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून कॉँग्रेसअंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. सतेज पाटील, आमदार महाडिक, आवाडे व पी. एन. यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. त्यात महाडिक, आवाडे व पी. एन. यांनी ‘सतेज पाटील सोडून आमच्या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या,’ अशी मागणी केल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच पडला आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश यांनी राहुल गांधींशी चर्चा केली आहे. या भेटीत राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत लवकर निर्णय घ्यावा व पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अशोक चव्हाण यांनी चौघा इच्छुकांना चर्चेसाठी बोलावले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत जसे नेते सर्व इच्छुकांना बोलवून पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला इतरांना पाठिंबा द्यावा असे सांगतात तसेच समजूत या चार नेत्यांची काढली जाणार आहे. ‘मॅडम ज्याचे नाव निश्चित करतील त्यास इतरांनी पाठिंबा द्यावा व पक्षाशी एकनिष्ठ राहावे, असाच संदेश प्रदेशाध्यक्ष देतील. विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानपरिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. काँग्रेस जिल्ह्यांत या जागेवर विजयाची दावेदार आहे. त्यामुळे बंडखोरी झाल्यास पक्षासमोरील अडचणी वाढू नयेत असे प्रयत्न होत आहेत. (प्रतिनिधी)



बिनविरोधसाठीच कसोशीने प्रयत्न
हसन मुश्रीफ : काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा
मुरगूड : विधानपरिषद निवडणुकीत इच्छुक उमेदवार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यामध्ये आताच ईर्षा टोकाला पोहोचली आहे. इतकी ईर्षा नको आहे. या दोघांमध्ये लढत झाल्यास जिल्ह्यामध्ये घोडेबाजाराला ऊत येईल आणि राज्यात वेगळा संदेश जाईल. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मनोमन इच्छा आहे. त्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
भडगाव (ता. कागल) येथे हसन मुश्रीफ खासगी कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी पत्रकारांबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी कागल तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, युवक खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष एम. एस. पाटील, नगरसेवक परेश चौगले, रणजित सूर्यवंशी, बी. एम. पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि जनसुराज्य एकत्रित विधानपरिषदेसाठी असणारे मतदार काँग्रेसइतकेच किंबहुना त्यांच्या पेक्षाही जास्त आहेत; पण वरिष्ठ पातळीवर कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराची चर्चाच नाही. त्यामुळे काँग्रेसतर्फे ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्याशी एकनिष्ठ राहणार आहोत. उमेदवारी मिळण्याअगोदरच महाडिक आणि पाटील यांच्यातील ईर्षा टोकाला गेल्याने या दोघांत चुरस निर्माण होऊन घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सतेज पाटील यांना उमेदवारी मिळाली, तर महाडिकांची आपण समजूत आणि महाडिक यांना उमेदवारी मिळाली, तर सतेज पाटील यांची समजूत काढू. टोकाच्या ईर्षेतून चुकीचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊ नये, यासाठी बिनविरोधबाबत आपला प्रयत्न असणार आहे.


समझोता झालाच नव्हता
मध्यंतरी हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक हे सर्वच निवडणुकीत एकत्र येणार, अशी चर्चा सुरू हाती. बऱ्याच कार्यक्रमांत दोघे एकत्रही आले होते; पण काही दिवसांपूर्वी संजय घाटगे आणि मंडलिक यांनी आपण यापुढेही एकत्र राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत मुश्रीफ यांना छेडले असता, आमच्यात समझोता झालाच नव्हता, असे उत्तर देऊन या विषयाला त्यांनी बगल दिली.


मुश्रीफ, महाडिक, कोरेंंना आवाडे भेटले
कोल्हापूर : माजी मंत्री प्रकाश
आवाडे यांनी शुक्रवारी आमदार
हसन मुश्रीफ, विनय कोरे, आमदार महादेवराव महाडिक यांची भेटी घेतल्या. विधानपरिषद निवडणुकीत पाठीशी राहण्याची विनंती त्यांनी केली.
आवाडे यांनी शुक्रवारी प्रथम विनय कोरे, त्यानंतर राजाराम साखर कारखान्यावर जाऊन आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रदेशाध्यक्षांनी त्यांना शनिवारी मुंबईला बोलावले आहे. तेथे काय भूमिका मांडायची, याबाबत उभयतांत चर्चा झाल्याचे समजते.
त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आवाडे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी मागणी आवाडे यांनी आमदार मुश्रीफ यांच्याकडे यावेळी केली. यावर आघाडी धर्माप्रमाणे कॉँग्रेस ज्याला उमेदवारी देईल, त्याच्यामागे राष्ट्रवादी ठाम राहील, अशी ग्वाही आमदार मुश्रीफ यांनी दिली. यावेळी जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष विलासराव गाताडे हेही उपस्थित होते.
(प्रतिनिधी)


राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी बंद खोलीत चर्चा
माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची भेट घेतली. कारखाना कार्यस्थळावर या दोघांमध्ये बंद खोलीत सुमारे एक तास चर्चा झाली. शुक्रवारी पहिल्यांदाच आवाडे यड्रावकरांना भेटले.


महाडिक, आवाडेंसह सहाजणांनी २० अर्ज नेले; एकही अर्ज दाखल नाही
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शुक्रवारी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सुनील महाजन यांच्यासह सहाजणांनी
यांनी वीस अर्ज नेले. आतापर्यंतच्या अर्जांची संख्या ४९ झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
डॉ. अमित सैनी, निवासी उपजिल्हाधिकारी
शंकर बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया होत आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल
झाला नाही.
आमदार महादेवराव महाडिक यांच्यावतीने प्रकाश ारंजकर यांनी चार अर्ज नेले, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यावतीने सुनील पाटील यांनी चार अर्ज नेले. प्रकाश मोरबाळे यांच्यावतीने अमित सावंत यांनी दोन अर्ज नेले, दीपक आनंदराव तिवले यांनी स्वत:साठी दोन अर्ज नेले, सुनील सीताराम महाजन यांनी स्वत:साठी चार अर्ज नेले, मकरंद बोराडे यांनी स्वत:साठी चार अर्ज नेले.

Web Title: Today, interested seekers will believe in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.