आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस'; शिर्डी, त्र्यंबकेश्वरात काकड आरती झाली नाही: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 03:32 PM2022-05-04T15:32:37+5:302022-05-04T15:44:03+5:30

राज ठाकरेंच्या आंदोलनाचा आज सर्वाधिक फटका हिंदूंना बसला असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Today is a black day for Hindus There was no Kakad Aarti in Shirdi and Trimbakeshwar says Sanjay Raut | आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस'; शिर्डी, त्र्यंबकेश्वरात काकड आरती झाली नाही: संजय राऊत

आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस'; शिर्डी, त्र्यंबकेश्वरात काकड आरती झाली नाही: संजय राऊत

googlenewsNext

मुंबई

राज्यात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं असताना शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या आंदोलनावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या आंदोलनाचा आज सर्वाधिक फटका हिंदूंना बसला असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात मशिदींमध्ये बेकायदेशीर भोंगे नाहीत. पण आज राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे हिंदू मंदिरांमध्येही पहाटे काकड आरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस' आहे आणि मनसेचा भोंगा मनसेवरच उलटणार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

"ज्या गोष्टी भाजपाला जमत नाहीत. अशा गोष्टी लहान पक्षांना हाताशी घेऊन गेल्या जात आहेत. भाजपाने आज राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी करुन घेतला आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव आखला जात आहे. आज जर सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो हिंदूंना बसला आहे. पहाटेच्या काकड आरतीला अनेक मंदिरांमध्ये केवळ मोजक्या लोकांनाच उपस्थित राहता येत असतं. पण मंदिरांवरील लाऊडस्पीकरवरुन परिसर आणि गावातील लोक काकड आरतीचे साक्षीदार होत असतात. आजच्या आंदोलनामुळे हिंदू मंदिरांमध्ये काकड आरतीही झालेली नाही. याची नाराजी अनेक हिंदूंनी आमच्याकडे व्यक्त केली आहे. आज राज्यात शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसारख्या पवित्र धार्मिक स्थळांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही", असं संजय राऊत म्हणाले. 

भाजपाने राज ठाकरेंचा बळी दिला
"भोंग्याचा वाद हा धार्मिकच असून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. याआधी त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसांमध्ये फूट पाडली. आता ते हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्यामागे भाजपाचाच हात आहे आणि आज पुन्हा एकदा भाजपाने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी दिला आहे. हे भोंग्यांचं आंदोलन मनसेवरच उलटणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.

हिंदूंना मोठा फटका
मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हा एवढा मोठा मुद्दा नव्हता. पण राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजपाने त्यांचा वापर करुन घेतला आहे. त्यांच्या आंदोलनामुळे आज मशिदींसह हिंदू मंदिरांनाही पहाटे आपली काकड आरती करता आलेली नाही. तसंच अनेक हिंदू मंदिरांनीही लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पण इतक्या कमी कालावधीत परवानगी देणं पोलिसांनाही शक्य नाही. त्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी दररोज हजारो, लाखो भाविक भेट देत असतात अशा पवित्र हिंदू मंदिरांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

उद्या हिंदूही रस्त्यावर उतरला तर आश्चर्य वाटणार नाही
मनसेच्या आंदोलनामुळे हिंदू भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. शिर्डीतल्या लोकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तर त्र्यंबकेश्वरातही अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी भजन, किर्तनाचे कार्यक्रम होते पण ते रद्द करावे लागले. याला जबाबदार हे आताचे नवहिंदू ओवेसी आहेत, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धावंतांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे आणि उद्या लाऊडस्पीकरच्या मागणीसाठी हिंदू रस्त्यावर उतरला तर आश्चर्य वाटणार नाही. मात्र मी मुख्यमंत्र्यांच्यावतीने तमाम हिंदूंना आवाहन करतो की त्यांना शांतता आणि संयम राखावा, असं संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: Today is a black day for Hindus There was no Kakad Aarti in Shirdi and Trimbakeshwar says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.