"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 09:30 PM2024-10-03T21:30:02+5:302024-10-03T21:30:45+5:30
Marathi Language: केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठी भाषिकांची मागच्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठी भाषिकांची मागच्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ’’आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे’’, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयानंतर म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.