आज ‘महाराष्ट्र बंद’
By admin | Published: June 5, 2017 06:02 AM2017-06-05T06:02:09+5:302017-06-05T06:12:01+5:30
संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) राज्यव्यापी बंदची हाक दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/नाशिक/ अहमदनगर : संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. उद्या राज्यभरातील शेतकरी बैलगाड्या, जनावरे आणि संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरणार आहेत.
नाशिक येथे रविवारी झालेल्या किसान क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. तसेच संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. बैठकीला ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, डॉ. अजित नवले, राजू देसले, चंद्रकांत बनकर, डॉ. गिरीधर पाटील, हंसराज वडघुले यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पुणतांबा गावातील ग्रामस्थांनीदेखील एकत्र येऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे़ कोअर कमिटीला बाजूला ठेवून संपाची सूत्रे नामदेव धनवटे, डॉ़ धनंजय धनवटे, बाळासाहेब चहाण, विजय धनवटे यांनी हाती घेतली आहेत़ कुणा एका व्यक्तीकडे संपाचे नेतृत्व न सोपविता गावासह जिल्ह्यातील इतर शेतकरी एकत्रित संपाची दिशा ठरवतील, असा निर्णय रविवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला़
उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना (रघुनाथदादा) सिटू, किसान सभा, छावा आदी पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत. सातवा वेतन आयोग देताना सर्वांना दिला दिला जातो. त्यात शिपाई, लिपिक, अधिकारी असा भेदाभेद केला जात नाही, मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असा भेदाभेद का? शेतकरी जितका मोठा तितका त्यांच्यावर कर्जाचा डोंगर मोठा आहे. काही भागांत अधिक जमीन असणारे शेतकरी नापिकीमुळे कर्जबाजारी आहेत. तर काहींचे खाते विलगीकरण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती का नको. त्यामुळे अल्पभूधारक, भूधारक असा भेद न करता सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती हीच शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत संप मागे घेतला जाणार नाही, असे ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी सांगितले.
>आठवडे बाजार उठविले
संपाच्या चौथ्या दिवशीही राज्यात अनेक ठिकाणी बाजार बंद ठेवण्यात आले. शहरांकडे जाणारे दूध व भाजीपाल्याची वाहने अडविण्यात आली. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात रविवारी भरणारे सर्व आठवडेबाजार उठवले गेले. इंदापूर तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर दूध, फळे, कांदे फेकत संताप व्यक्त केला.
>बंदला शिवसेनेचा पाठिंबा
शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी सोमवारी, ५ जून रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा असून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी माहिती शिवसेना सचिव आणि प्रवक्ते खासदार विनायक राऊत
यांनी दिली. - वृत्त/१३
पुरोगामी संघटना ठाम
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला डाव्या व पुरोगामी चळवळीतील संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, गोदी व बंदर कामगार सक्रियपणे संपात सामील होतील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते एस.के. शेट्ये यांनी दिला.
दुधावर बहिष्कार टाका!
राज्यातील शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकार जर गुजरातमधून दूध मागवणार असेल, तर हे दूध नाकारून मुंबईकरांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष शरद कदम यांनी केले आहे.शेतकरी पुत्रांच्या हाती संपाचे नेतृत्व कर्जमुक्ती व शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य होऊन शेतकरी जिंकल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही.
- डॉ. अजित नवले, शेतकरी किसान सभा.