राजभवनमध्ये आज ‘महाराष्ट्र महोत्सव’
By Admin | Published: February 27, 2015 06:24 AM2015-02-27T06:24:57+5:302015-02-27T06:24:57+5:30
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा महाराष्ट्र महोत्सव उद्या (शुक्रवार) राजभवनात साजरा होणार आहे.
मुंबई : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा महाराष्ट्र महोत्सव उद्या (शुक्रवार) राजभवनात साजरा होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगणार आहे.
गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन या वेळी घडविण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे या प्रसंगी उपस्थित असतील.
‘अमृतातेही पैजा जिंके’ असा ‘मराठीचा बोलू’ विकसित झाला तो मराठी मुलुखातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या बोलींनी. बोलींचे, मौखिक परंपरांचे आणि लोकसंस्कृती व लोककलांचे अतूट नाते आहे. हेच मध्यवर्ती सूत्र ठेवून मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लोककलांचा जागर राजभवनमध्ये होणार आहे,’ असे लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी सांगितले.
या महोत्सवात प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, तालवाद्यसम्राट विजय चव्हाण, कृष्णा मुसळे, लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, प्रमिला लोदगेकर, शाहीर सुरेश जाधव, हेमाली शेडगे, मदन दुबे, योगेश चिकटगावकर, कीर्ती बने, सुभाष खरोटे आणि लोककला अकादमीचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)