आजपासून ‘मेक इन इंडिया’
By admin | Published: February 13, 2016 04:00 AM2016-02-13T04:00:31+5:302016-02-13T04:00:31+5:30
देशाच्या उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. १८ तारखेपर्यंत
मुंबई : देशाच्या उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. १८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील उद्योगांसंबंधीची चर्चासत्रे, गुंतवणुकीसंबंधीचे करार, प्रदर्शने असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहाचे मुख्य केंद्र असलेल्या बीकेसी मैदानावर पंतप्रधान मोदी सकाळी ११.३०ला भेट देतील. तेथे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर ते विविध राज्यांच्या स्टॉल्सना भेट देतील; तसेच जगातील नामवंत कंपन्या, पंतप्रधान, मंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांशी चर्चा करतील. सायंकाळी ५ वाजता वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये सप्ताहाच्या उद्घाटनाचा मुख्य समारंभ होणार आहे.
स्वीडनचे पंतप्रधान केजेल लॉफव्हेन, फिनलँडचे पंतप्रधान जुहा पेट्री सिपिला, लिथुआनियाचे पंतप्रधान अलगिर्डास बटकॅविसियस यांच्या मुख्य उपस्थितीत
हा समारंभ होईल. राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
निर्मला सीतारामन हे प्रमुख पाहुणे असतील. रात्री ८ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी महालक्ष्मी टर्फ क्लबवर पंतप्रधान आणि सप्ताहानिमित्त येत असलेल्या मान्यवर प्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. बीकेसीमध्ये शनिवारी स्वीडन मेकस् इन इंडिया आणि जर्मनीची गुंतवणूक अशा दोन विषयांवर चर्चासत्रे आणि सीएनएन बिझनेस एशिया फोरमचा कार्यक्रम होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, एनएससीआय, महालक्ष्मी टर्फ क्लब आणि गिरगाव चौपाटीला भेट देऊन पाहणी केली.