आज अर्थ अवर
By admin | Published: March 25, 2017 01:47 AM2017-03-25T01:47:21+5:302017-03-25T01:47:21+5:30
पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे.
मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे. २००८ सालापासून राबवण्यात येत असलेल्या या प्रयोगाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. देशातील दिल्ली आणि मुंबईसारखी प्रमुख शहरे ‘अर्थ अवर’मध्ये प्राधान्याने सहभागी होत आहेत. मात्र मागील दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. ही औपचारिकता येऊ नये म्हणून आणि नागरिकांचा या चळवळीतला प्रत्यक्ष सहभाग आणखी वाढावा म्हणून तरुणाईने मुंबईकरांना ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने शनिवारी (२५ मार्च) रात्री ८.३० ते ९.३० या वेळी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड व सिडने मॉर्निंग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ साली आॅस्ट्रेलियामधील सिडनी येथे हवामान बदल (क्लायमेट चेंज) विषयावर जनजागृती अभियानाच्या निमित्ताने पहिला ‘अर्थ अवर’ साजरा करण्यात आला. ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास दिवे बंद ठेवण्यात आले. पहिल्याच प्रयोगात सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता सहभागी झाली. शिवाय उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठांनीही या चळवळीत सहभाग घेतला. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. पहिल्याच प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहता २००८ साली जगभर हा प्रयोग राबवण्यात आला. (प्रतिनिधी)
च्न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका-कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रिज सॅन फ्रॅन्सीस्को, स्पेस नीडल सीएटल, सिडनी आॅपेरा हाउस, रोममधील कलोसीयम असे नेहमीच प्रकाशित असणाऱ्या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते.
च्२००८ साली या मोहिमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ साली या प्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.
च्जगभर ‘अर्थ अवर’ साजरा होत असतानाच देशातील दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांनीही यात प्रत्यक्षरीत्या सहभाग नोंदवला.
च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने एक तास वीज बंद हा काही ठोस उपाय नाही. मात्र यानिमित्ताने का होईना नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. हा प्रतीकात्मक प्रयोग असला तरीदेखील नागरिक याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
च्मात्र गेल्या दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. परिणामी ही औपचारिकता येऊ नये म्हणून छोटेखनी पुढाकारासाठी का होईना प्रत्येकाने यात योगदान देणे क्रमप्राप्त आहे.
च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने नागरिक पर्यावरणाविषयी जागरूक आहेत आणि संघटित होत आहेत. हे दिलासादायक असल्याने नक्कीच पर्यावरण संवर्धनासाठी हे छोटे कामदेखील मोठेच आहे.