आज मध्य, हार्बरवर ‘मेगा’ तर पश्चिम रेल्वेमार्गावर ‘जम्बो’ ब्लॉक
By admin | Published: May 28, 2017 01:46 AM2017-05-28T01:46:25+5:302017-05-28T01:46:25+5:30
रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमधील तांत्रिक दोष दूर करणे, रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर ‘मेगा’ तर पश्चिम मार्गावर ‘जम्बो’ ब्लॉक घेण्यात
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमधील तांत्रिक दोष दूर करणे, रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर ‘मेगा’ तर पश्चिम मार्गावर ‘जम्बो’ ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा धिम्या मार्गावर, हार्बर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांंवर अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी १०.५८ ते दुपारी ४.०३ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. परिणामी सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नसल्याने प्रवाशांना भांडुप, विक्रोळी व कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत दुरु स्तीसाठी लोकल बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ठरावीक अंतराने पनवेल ते कुर्ला विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बरच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम व मध्य रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गाने सुरू राहणार आहेत. मात्र काही लोकल रद्द करण्यात येणार असून १०-१५ मिनिटे उशिराने लोकल धावणार आहेत.