आज मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, कार्यकर्त्यांची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 05:48 AM2018-11-26T05:48:16+5:302018-11-26T05:48:27+5:30
कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या पाच प्रमुख समन्वयकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले.
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या वाहन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यात प्रमुख नेत्यांची धरपकड करण्यात आली.
कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या पाच प्रमुख समन्वयकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले. अहमदनगरमध्ये शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले़ चिथावणीखोर व प्रक्षोभक भाषण करणार नसल्याचे हमीपत्र घेऊन न्यायालयाने भोर यांची सुटका केली़ न्यायालयाने सुटका केल्याने कार्यकर्त्यांसह ते मुंबई येथील मोर्चात सहभागी होणार आहेत.
कोल्हापूरला दसरा चौकात सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे, प्रताप नाईक हे मुंबईच्या वाहन मोर्चाचे नियोजन करीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आझाद मैदानात संवाद यात्रा धडकणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दुचाकी आणि चारचाकी घेऊन ‘वाहन मोर्चा’ काढण्यात येणार आहे, असे मुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.