आज मुंडे नाहीत, हे नशीबच!

By admin | Published: February 11, 2017 01:51 AM2017-02-11T01:51:18+5:302017-02-11T01:51:18+5:30

हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी

Today is not Munde, it is not destiny! | आज मुंडे नाहीत, हे नशीबच!

आज मुंडे नाहीत, हे नशीबच!

Next

हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी हे स्वपक्षातील आमदार हे मुख्यत: त्यांच लक्ष्य होतं. त्यांचे साम्राज्य, दहशत संपवण्याचा सुधाकरराव नाईकांनी चंगच बांधला होता. आपल्या या आमदारांना सांभाळून घ्या, हा संरक्षणमंत्री शरद पवारांचा सल्लाही म्हणे सुधाकररावांनी जुमानला नाही. पप्पू कलानीला अटक झाली, तेव्हा त्याला मारहाण करू नका, असे म्हणे पवारांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
एकाच वर्षात सुधाकररावांचे मुख्यमंत्रीपद गेलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. ते येताच भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. पवारांचे कलानी, ठाकूर तसंच अन्य गुन्हेगारांशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी केले. ठाकूर व कलानी यांचे म्हणे दाउदशीही संबंध होते. त्यामुळे पवारांचाही दाउदशी संबंध जोडण्यात आला. त्याच काळात बाबरी मशिदीवरून झालेल्या दंगली आणि बॉम्बस्फोट यांच्याशी दाउदचा संबंध असल्यानं पवारांची खूपच बदनामी झाली. इतकी की १९९५ च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा राज्यात पहिल्यांदाच पराभव झाला. युती सत्तेवर आली.
तेव्हापासून पप्पू व हितेंद्र यांचे दाउदशी संबंध असल्याचे आरोप सतत होतच आले. पप्पू खुनाबद्दल तुरुंगात आहे. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, फसवणूक, बेकायदा दारूनिर्मिती असे असंख्य आरोप आहेत. त्याची पत्नी ज्योती सध्या राष्ट्रवादीची आमदार आहे. ती उल्हासनगरची नगराध्यक्षही होती. तिच्यावरही गुन्हे आहेत. मुलगा ओमी याच्याविरोधातही गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाची तक्रार केली होती.
पण उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सारंच चित्र पालटलं. दोघाही भाजपा कार्यकर्त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली ओमीविरुद्धची तक्रार मागे घेतली. मग लागलीच ओमीच्या संघटनेशी भाजपाने आघाडी केली. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या कलानींशी हा भाजपाचा घरोबा. त्यामुळे पप्पू आणि ओमी कलानी गंगेत न्हाल्यासारखे पवित्र झाले आणि नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, दानवे यांच्यासोबतच बॅनर्सवर ओमी आणि पप्पू कलानी यांचीही छायाचित्रं झळकत आहेत. भाजपाचा सारा कारभार अगदी पारदर्शक! दुसरीकडे उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या प्रचाराचे जे बॅनर्स लागले आहेत, त्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासमेवत ज्योती कलानी यांची मोठी छायाचित्रं आहेत. पवारांवर आधीच शिक्का पडला आहे. त्यामुळे त्याचं काही वाटत नाही.
पण भाजपाचं काय?
आम्ही सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुरुंगात जातील, असे फडणवीस निवडणुकांआधी सांगत होते. पण ते तर चालले आहेत भाजपामध्ये. कलानी कुटुंब हे त्यापैकी एक. राज्यात अशा अनेकांना भाजपाने पवित्र करून घेतलं आहे. हे सारं पाहायला गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत, हे नशीबच.
- संजीव साबडे

Web Title: Today is not Munde, it is not destiny!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.