आजपासून 'नवरात्र' प्रारंभ

By Admin | Published: October 1, 2016 08:59 AM2016-10-01T08:59:58+5:302016-10-01T09:00:14+5:30

आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे ५ वाजल्यापासून मध्याह्नसमाप्तिपर्यंत म्हणजे दुपारी१.३०पर्यंत घटस्थापना करता येईल.

From today onwards 'Navaratri' starts | आजपासून 'नवरात्र' प्रारंभ

आजपासून 'नवरात्र' प्रारंभ

googlenewsNext

अप्पासाहेब पाटील, ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. १ - आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे ५ वाजल्यापासून मध्याह्नसमाप्तिपर्यंत म्हणजे दुपारी१.३०पर्यंत घटस्थापना करता येईल. या दिवशी सकाळी ९ ते १०.३० यावेळेत राहुकाल असला तरीही त्या वेळेतही पूजन करता येईल. घटस्थापनेकरिता राहुकाल वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. १० ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) व पारणा आहे व दसरा हा ११ ऑक्टोबर रोजी आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९ दिवस किंवा १० दिवसांचे अंतर असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शक्ती देवीची जी उपासना केली जाते त्याला नवरात्र असे म्हणले जाते. हे दिवस तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कमी अधिक होत असतात. या वर्षी घटस्थापनेपासून ११ व्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे त्यामुळे अकराव्या दिवशी दसरा येणे शुभ किंवा अशुभ अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो. यापूर्वी १९९८ मध्ये याच प्रमाणे अकराव्या दिवशी दसरा आलेला होता.

अशौचामुळे ज्यांना १ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) ४ ऑक्टोबर, ६ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १० रोजी नवरात्रोत्थापन करावे.
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 8 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. दुर्गाष्टमी ९ ऑक्टोबर रोजी आहे.
काही घरांमध्ये नवरात्रीच्या माळा घेण्याची पद्धत आहे. सर्वसाधारणपणे ९ माळा घेतल्या जातात मात्र या वर्षी नवरात्रोत्थापनेचा दिवस १०  वा असल्याने रोजची एक याप्रमाणे ९ ऐवजी १० माळा घ्याव्यात.
विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे ११ ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दुपारी २.२३ ते ३.१० या दरम्यान आहे. 
 

Web Title: From today onwards 'Navaratri' starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.