आज तरी आमची आघाडी कायम आहे, शरद पवारांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:32 AM2022-06-27T07:32:26+5:302022-06-27T07:33:25+5:30
शिवसेनेसोबतच्या महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा असून तो भविष्यातही कायम राखण्याची आम्हाला इच्छा आहे असे सूचक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.
नवी दिल्ली : आज तरी आमची आघाडी कायम आहे. काँग्रेस, शिवसेनेसोबतच्या महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा असून तो भविष्यातही कायम राखण्याची आम्हाला इच्छा आहे, असे सूचक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाशी संबंधित विविध प्रश्नांना शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत रविवारी उत्तरे दिली.
ते म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांचा एक गट सध्या आसाममध्ये असून त्यांना महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन हवे आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गुवाहाटीमध्ये गेलेले शिवसेनेचे आमदार महाराष्ट्रात परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत निश्चित बदल होईल. महाराष्ट्र विकास आघाडीला संपूर्ण पाठिंबा देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची भूमिका कायम आहे.
गुवाहाटीतून मुंबईत या, संख्याबळ सिद्ध करा
सुमारे ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे करत आहेत. त्यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, आपल्याला किती आमदारांचा पाठिंबा आहे हे एका नेत्याकडून वारंवार सांगितले जात आहे. इतके पाठबळ असेल तर ते नेते व त्यांचे आमदार इतके दिवस गुवाहाटीमध्ये काय करत आहेत? मला त्यांच्या या कृतीचे आश्चर्य वाटते. या नेत्याने मुंबईत येऊन राज्यपालांकडे किंवा कोणत्याही लोकशाही व्यवस्थेकडे जाऊन आपल्याकडे असलेली सदस्यसंख्या आहे, हे सिद्ध केले पाहिजे.
राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेच्या ज्या लोकांनी बंडखोरी केली आहे, त्यांची महाराष्ट्रामध्ये दुसरे सरकार यावे, अशी इच्छा आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास या बंडखोर आमदारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ज्या लोकांनी मेहनत घेतली, त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागेल. समजा राष्ट्रपती राजवट लागू झाली तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील.