आबासाहेब पटवारी यांचे आज ‘सहस्रचंद्रदर्शन’
By Admin | Published: August 27, 2016 04:09 AM2016-08-27T04:09:59+5:302016-08-27T04:09:59+5:30
भाजपाच्या वर्तुळात खळबळ उडवून देणारे ज्येष्ठ नेते आबासाहेब पटवारी यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन शनिवारी होत आहे.
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीचे तिकीट दोन वेळा कापले गेल्याबद्दल दीर्घकाळ बाळगलेले मौन सोडल्याने डोंबिवलीतील संघ आणि भाजपाच्या वर्तुळात खळबळ उडवून देणारे ज्येष्ठ नेते आबासाहेब पटवारी यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उद्या, शनिवारी होत आहे.
भाजपाच्या शिस्तपालन समितीवर दीर्घकाळ काम केलेले आणि पक्षशिस्तीबद्दल अनेकांचे कान टोचणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या हस्ते आत्मचरित्राचे प्रकाशन होणार असल्याने ते नेमके कोणाचे कान टोचतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नववर्ष स्वागतयात्रेच्या आरंभापासून आबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिलेले लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य अशोकराव कुकडे हेही या वेळी उपस्थित राहणार असल्याने संघ-भाजपा संबंधांबद्दल ते नेमके काय भाष्य करतात, याकडे परिवाराचे लक्ष लागले आहे.
सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा पार पडेल. त्याला वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हेही उपस्थित असतील.
वयाची ८० वर्षे पूर्ण करतानाच्या काळात भेटलेल्या व्यक्तींवर पटवारी यांनी आत्मचरित्रात प्रकाश टाकला आहे. नागरिकांमधून निवडून आलेला नगराध्यक्ष, अनेक पक्षांची मोट बांधून केलेले सत्ताकारण, त्या पदावर असताना झालेला तुरुंगवास, संघ-जनसंघ ते भाजपा असा राजकीय प्रवास हा त्यांच्या आत्मचरित्राचा गाभा आहे. त्याचबरोबर, राजकीय पदांपासून दूर ठेवल्यानंतरही पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रावर त्यांनी उमटवलेला ठसा, नववर्ष स्वागतयात्रेचे प्रवर्तक, अनेक सामाजिक उपक्रमांची सुरुवात यामुळे या सोहळ्यात नेमके कोणकोणते पदर उलगडले जातात, याविषयी उत्सुकता आहे.
(प्रतिनिधी)