औषधविक्रेत्यांचा आज संपाचा इशारा

By admin | Published: May 30, 2017 04:38 AM2017-05-30T04:38:53+5:302017-05-30T04:38:53+5:30

बेकायदा औषध उत्पादन, खरेदी आणि विक्रीवर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने ई-पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे

Today the strike by the pharmaceutical dealers | औषधविक्रेत्यांचा आज संपाचा इशारा

औषधविक्रेत्यांचा आज संपाचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेकायदा औषध उत्पादन, खरेदी आणि विक्रीवर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने ई-पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पोर्टलला विरोध करण्याची मागणी करत आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने मंगळवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यव्यापी औषधविक्रेत्यांच्या संघटनांमध्ये फूट पडल्याने काही संघटनांनी या संपाला तीव्र विरोध करत सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनांमधील कमालीची फाटाफूट पाहता हा संप अयशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.
केंद्र शासनाच्या ई-पोर्टलला विरोध, केमिस्टमधील फार्मासिस्टची अनिवार्यता हटवा, या पोर्टलमुळे देशातील ८ लाख औषध विक्रेते आणि ४० लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट येईल, अशी भीती व्यक्त करत हा संप पुकारला असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. या संपाला आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटना (एआयओसीडी) व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने (एमएससीडीए), केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट (सीएपीडी) यांनी पाठिंबा दिला आहे. याविरोधात २९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे ८ लाख औषधांची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संघटनांमध्येच फूट पडली आहे. या संपात इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन संघटनेने केमिस्टना रुग्णांचे हित लक्षात घेऊन बंद न करण्याचे आवाहन केले आहे. तर या एकदिवसीय संपामागे केंद्राच्या अन्न व औषध प्रसाधन कायद्यात बदल करून फार्मासिस्ट्स हटविण्याचा छुपा अजेंडा आहे, असे म्हणत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने संपात सहभागी न होण्याची भूमिका घेतली आहे.

भारतासारख्या देशाने प्रगत देशांची बरोबरी करताना आपल्याकडे असलेल्या उणिवांची गंभीर दखल घेऊन व त्यावरील उपाययोजनांचा विचार करून अॉनलाइन फार्मसी, ई-पोर्टलसारख्या बाबींचा विचार करणे योग्य होईल. सद्य:स्थितीत अॉनलाइन फार्मसी, ई-पोर्टलची पूर्तता करणे शक्य नाही. केवळ परकीय चलनाची गुंतवणूक आणि स्पर्धात्मक व्यावसायिक व्यवस्था यापेक्षाही सामान्य जनतेचे आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे या एकदिवसीय संपात देशातील ८ लाख औषधविक्रेते आॅनलाइन फार्मसीची नीती व केंद्र सरकारच्या नोटीसविरोधात संपावर जाणार आहेत.
- जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटना

औषध मिळत नसतील तर १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करा.

Web Title: Today the strike by the pharmaceutical dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.