ब्रह्मांड परिसरात आज ‘लोकमत आपल्या दारी’
By admin | Published: August 3, 2016 03:17 AM2016-08-03T03:17:30+5:302016-08-03T03:17:49+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून प्रभागातील नागरीकांच्या समस्या सुटल्या
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून प्रभागातील नागरीकांच्या समस्या सुटल्या किंवा कसे, याचा मागोवा घेण्यासाठी तसेच नगरसेवकांनी केलेल्या कामांचा उहापोह करण्याकरिता ‘लोकमत आपल्या दारी’या कार्यक्रमाचे उद्या बुधवार दि. ३ आॅगस्ट रोजी प्रभाग क्र. २ मध्ये आयोजन करण्यात आले आहे.
पातलीपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, हिरानंदांनी इस्टेट, आयुक्त निवास, ब्रम्हांड, आझादनगरचा काही भाग आणि मानपाड्यातील शिवाजी नगर, असा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. मतदार संख्येच्या निकषानुसार हा दुसऱ्या क्र मांकाचा प्रभाग आहे.
विजेचा खेळखंडोबा ही या भागातील मुख्य समस्या आहेच, शिवाय शिवाजी नगरला दिली जाणारी सापत्न वागणूक यामुळे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने आणि एकदा खंडीत झालेला वीज प्रवाह पूर्ववत होण्यास पाच ते सात तासांचा कालावधी लागत असल्याने लोक त्रस्त आहेत. येथील सार्वजनिक शौचालयांची अतिशय दुरवस्था झाली आहे. या प्रभागातील काही भागात नळाद्वारे अतिशय गढूळ पाणी येते.डोंगरीपाडा भागातील किंगकॉंग नगर भागात अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून या भागांना पालिकेने पाणी देण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील नागरीकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. ब्रम्हांडच्या नागरिकांना ठाणे परिवहनच्या अपुऱ्या बस सेवेचा त्रास सहन करावा लागत आहे. एक बस गेल्यावर अर्ध्या तासाहून अधिक वेळ येथे बस नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.
या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या नगरसेवकाला, पालिका अधिकाऱ्यांना आणि इतर प्रशासनाला आपल्या कामांचा जाब विचारण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन लोकमतने केले आहे.
या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, पालिकेचे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड आणि इतर राजकीय मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)