आज जायकवाडीत पाणी!
By admin | Published: November 3, 2015 03:03 AM2015-11-03T03:03:16+5:302015-11-03T03:03:16+5:30
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या विसर्गापैकी नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे, तर अहमदनगर धरणसमूहातील पाणी अद्याप
औरंगाबाद/नाशिक/नगर : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या विसर्गापैकी नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे, तर अहमदनगर धरणसमूहातील पाणी अद्याप प्रवरेत दाखल झाले नसून या पाण्यास जायकवाडीत दाखल होण्यास निर्धारित वेळेपेक्षा १६ तास उशीर होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली, मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर संध्याकाळी धरणाचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले.
सोमवारी मुळा धरणातून ५,६८४ क्युसेस, निळवंडे २,०००, दारणा ४,०००, मुकणे १,००० व कडवा ३,००० क्युसेस असा विसर्ग करण्यात येत होता. यापैकी नाशिक जिल्ह्यातील दारणा, मुकणे व कडवा धरण समूहातून सोडलेले पाणी नांदुर मधमेश्वर प्रकल्पातून सोमवारी दुपारी १२ वाजता गोदावरीच्या पात्रात दाखल झाले. एकत्रितपणे नांदूर-मधमेश्वरमधून ४७६९ क्युसेस असा विसर्ग होत असल्याने गोदावरीतून पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. हे पाणी मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत जायकवाडी धरणात येऊन धडकणार आहे, असे जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातून अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
मुळा धरणातून सोडलेले पाणी सोमवारीप्रवरेच्या पात्रात दाखल झाले आहे, तर निळवंडे धरणातून सोडलेले पाणी ओझर वेअरपर्यंत आले असून ओझर वेअर रिकामा केल्याने जोपर्यंत तो भरत नाही तोपर्यंत तेथून पुढे पाणी प्रवरेत येणार नसल्याचे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नाशिकमध्ये पाणी सोडले, पाणी रोखले...
नाशिकमध्ये रविवारी रात्रीच्या आंदोलनानंतर गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती देण्यात आली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दुपारी बारा वाजता पाचशे क्युसेक पाणी सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.
मात्र दुपारी सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना घेराव घातल्यानंतर साडेचार वाजता निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली व गंगापूर धरणातून पाणी सोडण्याबाबत शासन पातळीवर चर्चा सुरू असल्यामुळे पाणी सोडणे बंद करण्याची सूचना दिली. त्यानंतर सव्वापाच वाजता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाचे दरवाजे पुन्हा बंद केले.
प्रवरेत ओझर वेअर ते पैठणदरम्यान १६ बंधारे असून ते सर्व पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे ते भरल्यानंतरच पाणी पुढे जाईल.
नगरमध्ये बंदोबस्त
मुळा, भंडारदरा-निळवंडे धरणातून रविवारी रात्री जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांचे सहा प्लाटून तैनात असून एका तुकडीमध्ये शंभर पोलीस कर्मचारी आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास कलम १८८ अन्वये थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नगरचे पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले.