१.६२ कोटी मतदार हक्क बजावणार आज
By admin | Published: October 15, 2014 01:35 AM2014-10-15T01:35:43+5:302014-10-15T01:35:43+5:30
विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात होत आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी प्रमुख पक्षासह बसपा, मनसे या लहान
१८,९३६ मतदान केंद्र : ६२ मतदारसंघात १०१९ उमेदवार
नागपूर : विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात होत आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी प्रमुख पक्षासह बसपा, मनसे या लहान पक्षांचे तब्बल १०१९ उमेदवार भाग्य अजमावित आहेत. त्यांना विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमधील एकूण १ कोटी ६२ लाख ५० हजार ७१४ मतदार १८ हजार ९६३ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गेल्या १ आॅक्टोबर रोजी लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीला खरी रंगत आली होती. सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी एकमेकांविरोधात मोठ्या संख्येने दंड थोपटले आहे. प्रचाराचा शेवट झाला असून आता मतदारांना आपला कौल द्यायचा आहे. त्याकरिता उमेदवारांसह मतदारही सज्ज झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २११ उमेदवारांना ४ हजार ५२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून त्यामध्ये १९ केंद्र संवेदनशील आहेत. मतदानाकरिता ४ हजार ८६२ ईव्हीएम मशिन उपयोगात आणण्यात येत आहेत. मतदान केंद्राच्या सुरक्षेकरिता ७ हजार ४२१ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १ हजार होमगार्ड मदतीकरिता देण्यात आले आहेत. तसेच राज्य राखीव दलाच्या १० तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यात आठही मतदारसंघांत एकूण १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २२ लाख २१ हजार ६२३ मतदार २५०४ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रियेत ११ हजार २०० कर्मचारी तैनात राहणार आहेत. एकूण २५०४ मतदान केंद्रांपैकी ६९ केंद्र क्रिटिकल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ५८९० बॅलेट युनिट व ३२५० कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. आज मंगळवारी दुपारपासूनच मतदान कर्मचारी मतदान यंत्र घेऊन त्या-त्या मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.
राज्यात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक संवेदनशील आहे. त्यामुळे तेथे ८७२ मतदान केंद्रांपैकी २३४ केंद्र संवेदनशील आणि १८३ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. नक्षलवाद्यांच्या कारवाया बघता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन मतदारसंघ असून केवळ ३६ उमेदवार रिंगणात आहेत. गडचिरोलीप्रमाणे गोंदिया जिल्ह्याचा काही भाग नक्षलग्रस्त असल्याने तेथेदेखील १२३० मतदान केंद्रांपैकी २० संवेदनशील व २१ अतिसंवेदनशील केंद्र आहेत. १९५० सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ५५६३ मतदान कर्मचारी-अधिकारी सज्ज झाले आहेत.
अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ९३ उमेदवार रिंगणात आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये एकूण १०१ उमेदवार, तर वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये ५७ उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.अकोला जिल्ह्यात एकूण १ हजार ४८० मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी १४५ केंद्र संवेदनशील, अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. मतदानासाठी जिल्ह्यात एकूण ६ हजार ३३१ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदान प्रक्रियेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एकूण २ हजार ४४६ पोलिस अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात सहा मतदारसंघासाठी १९६५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्याकरिता १० हजार ५०० कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता १००० पोलीस-सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण १ हजार ९१ मतदान केंद्र असून, त्यापैकी १०८ संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्र आहेत. मतदानासाठी एकूण १२ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, कायदा व सुवस्था परिस्थितीसाठी ५ हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात एकूण ९६५ मतदान केंद्र असून, त्यापैकी ३७ केंद्र संवेदनशील व अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मतदानासाठी एकूण ४ हजार ९४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, १ हजार ४१६ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात सात मतदारसंघातील १०३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला २० लाख ५ हजार ५८३ मतदार करणार आहेत. त्याकरिता २३३९ मतदान कें द्र तयार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ९५ केंद्र संवेदनशील असून ३ केंद्र अतिसंवेदनशील आहेत. मतदानाकरिता १२ हजार ४०० कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येत असून ३ हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात तीन मतदारसंघात ५३ उमेदवार रिंगणात असून त्यांना मतदान करण्याकररिता ११५९ मतदान केंद्रावर ९ लाख १२ हजार २०८ मतदारांकरिता मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील ९ केंद्र संवेदनशी असल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)
दोन मतदारसंघांत 'व्हीव्हीपॅट'
आधी गुप्त मतदान पद्धती अवलंबिली जात होती. त्यामुळे एकदा मतदान केले आणि ते बॅलेट बॉक्समध्ये मतपत्र टाकले की, मतदान कोणाला केले, हे मतदात्यालादेखील पाहता येत नसे. आता नव्यानेच निवडणूक आयोगाने काही आधुनिक बदल केले आहेत. विदर्भात अमरावती जिल्ह्यात अमरावती व अचलपूर या दोन मतदारसंघांत 'व्हीव्हीपॅट'चा पहिल्यांदाच वापर होणार आहे. व्हीव्हीपॅटमध्ये आपण कोणाला मतदान केले हे पाहता येणार येणार आहे. यासाठी सात सेकंदांचा अवधी मिळणार आहे.
बदली झालेले कर्मचारी मतदानाला मुकणार
गडचिरोली : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रशासनाच्यावतीने निवडणुकीवर कामावरील कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या, अशा कर्मचाऱ्यांची नावे बदलीच्या मूळ ठिकाणीच असल्याने असे कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.