आज महिलांचा ‘अंमल’!
By admin | Published: March 8, 2016 03:12 AM2016-03-08T03:12:37+5:302016-03-08T03:12:37+5:30
राज्य पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम ८ टक्क्यांपर्यंत असलेतरी मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अंमलदारांची धुरा त्यांच्याकडे असणार असून
मुंबई : राज्य पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम ८ टक्क्यांपर्यंत असलेतरी मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अंमलदारांची धुरा त्यांच्याकडे असणार असून, हद्दीत घडणारे सर्व गुन्हे आणि ‘डायरी’वरील महत्त्वाची नोंद त्यांच्या स्वाक्षरीनिशी होणार आहे.
८ मार्चला जगभरात साजऱ्या होणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून खात्यातील महिलांसाठी प्रोत्साहनपर हा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये आणि अधीक्षक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात १,०७६ पोलीस ठाणी आहेत. ८ मार्चला महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘ठाणे अंमलदार’पदी नेमणूक करावी, असे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांना दिलेले आहेत.
महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिला दिनाची भेट म्हणून त्या ठाणे अंमलदारपदी काम करतील, त्यामुळे त्यांच्या कामाचा उत्साह वाढू शकेल, सर्व पोलीस आयुक्त/ अधीक्षकांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.
एकाचवेळी या सर्व ठिकाणच्या अंमलदार महिला असण्याची पोलीस दलाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असणार आहे. (प्रतिनिधी)
> 25,311
महिला पोलीस
महाराष्ट्रात सध्या
९ पोलीस आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालये कार्यरत असून, या ठिकाणी
२ लाख ६ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा विविध आयुक्तालये, विभाग व शाखांमध्ये कार्यरत आहे. त्यामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या २५ हजार ३११ इतकी आहे.
> पोलीस ठाण्यातील अंमलदार हा अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो. कार्यक्षेत्राच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची नोंद त्याच्याकडे असलेल्या डायरीत केली जाते. त्याला प्राथमिक माहिती नोंद (एफआयआर) म्हटले जाते. त्यांच्या स्वाक्षरीनिशी नोंद केल्यानंतर त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त होते.
‘एफआयआर’वरूनच गुन्ह्याबाबतची कलमे, त्या प्रकरणाचा तपास व त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना त्यांची प्रत जोडणे बंधनकारक असते. त्यामुळे पोलीस ठाण्यात अनेक वरिष्ठ अधिकारी असले तरी ठाणे अंमलदाराची भूमिका निर्णायक असल्याने या ठिकाणी अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी सोपविली जाते.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांतील अंमलदाराची ड्युटी महिलांना देण्यात यावी, असे आदेश महासंचालक दीक्षित यांनी दिलेले आहेत.