भास्करबुवा बखले यांची आज जयंती

By admin | Published: October 17, 2016 08:48 AM2016-10-17T08:48:21+5:302016-10-17T08:48:21+5:30

एक अष्टपैलू, चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत; गायनाचार्य व अभिजात नाट्यसंगीताच्या परंपरेचे प्रवर्तक भास्करबुवा बखले यांची आज जयंती

Today's birth anniversary of BhaskarBua Bakhale | भास्करबुवा बखले यांची आज जयंती

भास्करबुवा बखले यांची आज जयंती

Next
>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. 17 - (१७ ऑक्टोबर १८६९-८एप्रिल १९२२)
एक अष्टपैलू, चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत; गायनाचार्य व अभिजात नाट्यसंगीताच्या परंपरेचे प्रवर्तक. भास्करबुवांचा जन्म बडोदे संस्थानातील कठोर या गावी झाला. घरची गरिबी असल्याने प्राथमिक शालेय शिक्षण व त्यानंतर संस्कृत पाठशाळेतले शिक्षण त्यांना फार कष्टाने करावे लागले. आवाज मात्र लहानपणापासून अत्यंत गोड, त्यामुळे वर्गशिक्षक यांच्या संस्कृत श्लोकपठणावर खुश असत. या गुणांमुळेच पिंगळेबुवा नावाच्या हरिदासाकडे त्यांची संगीत शिक्षणाची सोय झाली. भास्करबुवांच्या आवाजाची तारीफ पुढे किर्लोस्कर कंपनीतील भाऊराव कोल्हटकरांच्या कानी गेली आणि त्यांनी भास्करला कंपनीत आणले. 
 
कंपनीत असता इंदूरला त्यांचा आवाज ऐकून सुप्रसिध्द बीनकार उस्ताद बंदे अलीखाँ अत्यंत खुश झाले आणि स्वतः होऊन त्यांनी भास्करबुवांना संगीतशिक्षणासाठी गंडा बांधला. सुमारे दोन वर्षे (साधारणतः सप्टेबंर १८८४ ते ऑक्टोबर १८८६) किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये काम केल्यावर त्यांचा आवाज फुटला. त्यानंतर कंपनीत मानहानीचे प्रसंग घडल्यामुळे त्यांनी कंपनी सोडली. उच्चदर्जाची गायनकला शिकण्यासाठी ते पुन्हा बडोद्यास आले आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायक उस्ताद फैज महंमद खाँ यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले. अत्यंत चिकाटीने, मेहनतीने व निष्ठेने त्यांना या खाँसाहेबाकडून विद्या प्राप्त केली आणि खानदाणी आणि खाणदाणी गवयी म्हणून लौकीक प्राप्त केला. उस्ताद फैज महंमद खाँकडून विद्या मिळाल्यावर त्यांच्याच मार्गदर्शनावरून त्यांनी आग्रा घराण्याचे उस्ताद नथ्यनथाँ आग्रेवाले यांचा गंडा बांधला. त्यांच्याच सूचनेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर भास्करबुवांनी जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांना गुरू केले आणि त्यांच्या गायकीचे मर्मही आत्मसात केले. 
 
भास्करबुवांनी ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तिन्ही घराण्यांच्या गायकीचे सौंदर्य आत्मसात केले होते. चीजेची मांडमी व रागाचे स्वरूप स्पष्टपणे व्यक्त करणारे जिवंत स्वरालाप हे ग्वाल्हेरचे वैशिष्ट्य. भावपूर्ण शब्दोचार व लयबध्द बोलाची मांडणी हे आग्रा घराण्याचे वैशिष्ट्ये आणि लययुक्त, डौल साधणाऱ्या वैचित्र्यपूर्ण तानांच्या आकृती निर्माण करणारे जयपूरच्या गायकीचे वैशिष्ट्य असा त्रिकोणी संगम त्यांच्या गायकीत झाला होता. ख्याल, ठुमक्या, नाट्यसंगीत, सुगम संगीत वगैरे संगीताचे सर्व प्रकार सारख्यास प्रभुत्वाने आणि ढंगदारपणे म्हणणारे हे चतुरस्त्र कलावंत होते. सौंदर्ययुक्त आणि समतोल गायकीचा उच्च आदर्श त्यांनी संगीत जगतात निर्माण केला. प्रसन्न व्यक्तिमत्व, सौंदर्यपूर्ण गायकी आणि प्रेमळ व दिलदार स्वभाव या तिन्ही गुणांमुळे भास्करबुवांची ख्याती हिदुस्थानात सर्वत्र पसरली आणि कलाक्षेत्रात त्यांना सर्वसामान्यता लाभली. त्यांनी विद्यादानही मुक्तपणे केले. आरंभी किर्लोस्कर आणि नंतर गंधर्व नाटक मंडळीचे ते संगीत गुरू होते. विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी यांसारख्या नाटकांना संगीत देऊन तसेच बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या समर्थ कलावंताना तालीम आणि मार्गदर्शन देऊन मराठी नाट्यसंगीताचे दर्जेदार स्वरूप त्यांनी घडविले व नाट्यसंगीतात सौंदर्ययुक्त व भरीव असा कामगिरी केली. नाट्यसंगीत त्यांनी अभिजात संगीताच्या पातळीवर नेऊन ठेवले. 
 
त्यांनीच घडविलेले हे नाट्यसंगीताचे स्वरूप आजही कमी अधिक फरकाने कायम असल्यामुळे त्यांना नाट्यसंगीताचे ‘कुलस्वामी’ म्हणून संबोधता येईल. मास्तर कृष्णराव, बालगंधर्व, बागलकोटकर, बापूराव केतकर वगैरे मंडळी त्यांचे शिष्य असून, गोविंदराव टेबें, र.कृ.फडके, केशवराव भोळे वगैरे कलावंत त्यांना गुरूस्थानी मानीत असत. धारवाड येथील ट्रेनिंग कॉलेजात त्यांनी काही काळ गायन-शिक्षक म्हणून नोकरीही केली (१९०६-०८). त्यांनी पुणे येथे ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली (१९११). 
पुणे येथे त्यांचे निधन झाले.
 
सौजन्य : मराठी विश्वकोश 
 

Web Title: Today's birth anniversary of BhaskarBua Bakhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.