‘लोकमत’च्या वर्धापन दिनी आज स्नेहीजनांचा मेळा
By Admin | Published: December 28, 2015 01:25 AM2015-12-28T01:25:45+5:302015-12-28T01:25:45+5:30
वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ वृत्तपत्राने पुण्यात १६ वर्षे पूर्ण करून १७ व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे निमित्त
पुणे : वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ वृत्तपत्राने पुण्यात १६ वर्षे पूर्ण करून १७ व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे निमित्त साधण्यासाठी सोमवारी (दि़ २८) सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे़
गेल्या १६ वर्षांत पुणेकरांच्या पाठबळावर ‘लोकमत’ची पुण्यात दमदार वाटचाल सुरू आहे. पुण्यात अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा
करीत ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या. पुण्यच्या नागरी प्रश्नांवर ‘आता बास’, ‘कशासाठी पुण्यासाठी’ यासारख्या मोहीमांमधून वाचा फोडली. पुण्याच्या विकासासाठी उत्तरे शोधण्यासाठी ‘व्हिजन पुणे’, ‘बिल्डींग पुणे’ यासारखे उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये सहभाग घेता यावा यासाठी ‘मी पत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला. अनेक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम तर महिला सन्मानाची चळवळ बनली आहे.
वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ याचे भान ठेवून साहित्य, संस्कृती, कला अन् विद्येच्या या माहेरघरात या परंपरेला साजेशी भूमिका घेतल्यानेच पुणे शहरात ‘लोकमत’ रुजला आणि वाढला़ प्रगतीची गरुडभरारी घेत, ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ ची दमदार वाटचाल सुरु आहे़
ऋणानुबंधाच्या या गाठी आणखी घट्ट करण्यासाठी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी केले आहे़
(प्रतिनिधी)