साईबाबांच्या निर्वाणाची आज शताब्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:43 AM2018-10-15T06:43:25+5:302018-10-15T06:43:42+5:30
शुक्रवारी सोहळयाचा समारोप : पंतप्रधान राहणार उपस्थित
- प्रमोद आहेर
शिर्डी : जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या महानिर्वाणाला सोमवारी शंभर वर्षे होत आहेत़ सोमवारी विविध कार्यक्रम होणार आहेत.
नित्यनेमाने फेरीला जाणारे बाबा २८ सप्टेंबर १९१८ रोजी दोन-तीन दिवस तापाने आजारी पडले. त्यानंतर त्यांनी अन्न जवळपास वर्ज्य केले. बाबांनी २ आॅक्टोबरपासून द्वारकामाईत वझे नावाच्या भक्ताकडून रामविजय ग्रंथाची दोन पारायणे करवून घेतली. त्यानंतर बाबांनी ११ आॅक्टोबरला वझे यांना श्रीफळ व दक्षिणा देऊन पोथीची समाप्ती केली.
भिक्षेला जाताना बापूसाहेब बुटी व निमोणकर यांना बाबांना जवळपास उचलूनच न्यावे लागे. १३ आॅक्टोबरपासून सकाळची भिक्षा बंद झाली होती.
१५ आॅक्टोबरला दुपारच्या आरतीनंतर बाबांनी नेहमी आपल्याबरोबर मशिदीत जेवणाºया बापूसाहेब बुटी, काकासाहेब दीक्षित आदी मंडळींना घरोघर जेवणासाठी पाठवून दिले. बाबांनी अंतसमयी लक्ष्मीबाई शिंदे यांना खिशातून नऊ रूपये काढून दिले व थोड्या वेळाने म्हणू लागले, ‘अरे मला आता इथे बरे वाटत नाही, दगडी वाड्यात (बुटीवाडा) घेऊन चला म्हणजे बरे वाटेल!’ हीच बाबांची शेवटची आज्ञा. बाबांनी त्यानंतर बयाजी कोतेंच्या अंगावर टेकून प्राण सोडला.
वर्षभर उपक्रम
शताब्दी वर्षाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ झाला होता, तर समारोप पंतप्रधानांच्या उपस्थितीत १९ आॅक्टोबरला होत आहे. साई संस्थानने साई पादुकांचा देश-विदेशातही वर्षभर दौरा आयोजित केला होता. राज्य सरकारने मात्र शताब्दी वर्षात शिर्डीच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही.