सभापतिपदांच्या आज निवडी
By Admin | Published: April 3, 2017 01:43 AM2017-04-03T01:43:42+5:302017-04-03T01:43:42+5:30
जिल्हा परिषदेच्या विविध विषय सभापतिपदांच्या निवडी उद्या (दि. ३) जाहीर होणार आहेत.
पुणे : जिल्हा परिषदेच्या विविध विषय सभापतिपदांच्या निवडी उद्या (दि. ३) जाहीर होणार आहेत. त्यामुळे बांधकाम व आरोग्य समिती, समाजकल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती या चार समित्या आहेत़ त्याचबरोबर स्थायी समिती व जलसंधारण समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात, तर शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापतीपद हे उपाध्यक्ष यांच्याकडे असते.
इंदापूरचे दिवंगत आमदार गणपतराव पाटील यांच्या स्नुषा वैशाली प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या स्नुषा सुनीता गावडे आणि शिरूर तालुक्यातील कुसुम मांढरे, हवेली तालुक्यातील दिलीप घुले, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार आणि मुळशी तालुक्यातील शंकर मांंडेकर, दौंडच्या जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके आणि रणजित शिवतरे हे सभापतिपदासाठी इच्छुक आहेत़
हवेली तालुक्यातही १३ जागांपैकी तब्बल ८ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे हवेली तालुकाही सभापतिपदांच्या शर्यतीमध्ये आहे.
बारामती तालुक्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा जागांवर, दौंडमध्ये पाच तर इंदापूरमध्ये चार जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत़ त्यामुळे या तालुक्यांमध्ये सभापतिपद दिले जाणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे़ (प्रतिनिधी)